पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रस्तावना


 भारताचा अर्वाचीन इतिहास, म्हणजे इ. स. १००० पासूनचा इतिहास, हा भारतीयांना मोठा लाजिरवाणा आणि दुःखास्पद आहे. हा इतिहास म्हणजे हिंदूंच्या पराभवाचा व पारतंत्र्याचा इतिहास आहे. विजयनगर, मराठे, असे काही अपवाद त्यात आहेत; पण ते अपवाद म्हणावे लागतात यावरूनच त्यांचे मूळ स्वरूप सष्ट होते. आणि हे अपवादही राजकीय क्षेत्रातले आहेत. इतर क्षेत्रांतला पराभव फारच लज्जास्पद आहे. साधारण तेराव्या शतकापासून एकुणिसाव्या शतकापर्यंत पाचसहाशे वर्षांच्या काळात या भूमीच्या कुशीत या अन्य क्षेत्रांत कोणी व्यास, वाल्मीकी, यास्क, पाणिनी, वराहमिहिर, आर्यभट्ट, कालिदास, शूद्रक, बुद्ध, महावीर, शंकराचार्य यांसारखा थोर पुरुष निपजलाच नाही; पण पुढे पाश्चात्यविद्या या भूमीत प्रसृत झाल्यानंतर मात्र राममोहन राय, रानडे, टिळक, सावरकर, जगदीशचंद्र, प्रफुल्लचंद, रवीन्द्रनाथ, शरदबाबू, महात्माजी, पंडितजी यांच्या रूपाने ती महापुरुषपरंपरा पुन्हा येथे अवतरू लागली.
 याची कारणमीमांसा करून ती ग्रंथरूपाने मांडावी असे फार दिवस मनात् होते. 'महाराष्ट्रसंस्कृती' हा जो ग्रंथ सध्या मी लिहीत आहे त्याच्यासाठी प्राचीन इतिहासाचे वाचन चालू असताना ती कारणमीमांसा मनात तयार होत होती. त्याच वेळी विश्वहिंदुपरिषदेचे सरचिटणीस श्री. दादासाहेब आपटे यांनी परिषदेच्या उद्दिष्टांच्या अनुरोधाने मी काही लिहावे अशी सूचना केली. हा विषय मनात होताच. तेव्हा त्यावर एक लेख लिहावा असे ठरवून १९६५ च्या मे महिन्यात मी त्याचा आराखडा करू लागलो. त्याच वेळी कमीत कमी चार तरी लेख होतील असे ध्यानात आले. प्रत्यक्षात चारांचे आठ प्रदीर्घ लेख होऊन आज त्याला अडीचशे पानांच्या प्रबंधाचे रूप आले आहे. हे सर्व लेख जुलै १९६५ ते सप्टेंबर १९६६ या वर्ष सवा वर्षाच्या काळात 'वसंत' मासिकात प्रसिद्ध झालेले आहेत. तेच आता पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहेत.
 हिंदूंच्या दीर्घकालीन पारतंत्र्यास आणि त्यांच्या सर्वांगीण अधःपातास या अर्वाचीन काळात येथल्या शास्त्री- पंडितांनी सनातन हिंदुधर्माला जे हीन व विकृत रूप दिले होते तेच प्रामुख्याने कारणीभूत आहे, असा या प्रबंधाचा मुख्य सिद्धान्त आहे. प्राचीन काळापासून धार्मिक विचारांचे दोन प्रवाह या भूमीत