पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८ : प्रस्तावना

दत्तप्रसन्न काटदरे यांचा मी कायमचाच ऋणी आहे. लेखाची लांबीरुंदी, त्यातील विचारसरणी, त्याची सौम्य वा तिखट भाषा यांवर त्यांनी कधीही, कसलीही बंधने घातली नाहीत. या प्रबंधातील शेवटची दोन-तीन प्रकरणे तर नेहमीच्या लेखमर्यादेच्या दृष्टीने दुप्पट-तिप्पट लांबीची झाली आहेत; पण ती सर्व जशीच्या तशी त्यांनी छापली. त्यांचे विभाग करण्याचे त्यांनी मनातही आणले नाही. आणि हे सहकार्य आज दोन तपे ते देत आहेत. त्यांच्या ऋणाचा केवळ निर्देश करणे एवढेच मला शक्य आहे. विश्वहिंदुपरिषदेचे सरचिटणीस श्री. दादासाहेब आपटे यांचे या प्रबंधातील विचारांच्या प्रसाराला मोठेच साह्य झाले आहे. पहिल्या प्रकरणापासून त्यांनी कानडी, गुजराथी, हिंदी इ. भाषांत त्याची भाषांतरे करून ती प्रसिद्ध करण्याची व्यवस्था केली होती. बंगलोरचे 'विक्रम' साप्ताहिक व अहमदाबादचे 'साधना' साप्ताहिक यांत ही भाषांतरे येत असत. पुण्याच्या 'तरुण भारता'ने मराठीतून ही प्रकरणे सारांशरूपाने त्या त्या वेळी प्रसिद्ध केली. सध्या 'राष्ट्रधर्म' लखनौ हे मासिक व 'पांचजन्य' लखनौ हे साप्ताहिक यांत हिंदीमधून हा प्रबंध क्रमशः प्रसिद्ध होत आहे. या सर्व नियतकालिकांचे संपादक व प्रकाशक यांचा मी फार आभारी आहे.
 वेदकालापासून आजपर्यंतच्या हिंदुसमाजाच्या संघटन-विघटन तत्त्वांचा इतिहास लिहावयाचा तर त्यासाठी किती ग्रंथ लागतील याची सहज कल्पना येईल. प्रत्येक लेखकाला ग्रंथोपलब्धीची नेहमीच चिंता वाटत असते; पण मी या चिंतंतून सर्वथा मुक्त होतो. आमच्या स. प. कॉलेजच्या ग्रंथालयात मला मुक्तद्वारच आहे. तेथले ग्रंथालय प्रमुख डॉ. कावळे व ग्रंथपाल श्री. मेहेंदळे यांनी ग्रंथांची उणीव मला कधीच पडू दिली नाही. इतर ग्रंथालयांतून आणून किंवा विकत घेऊन त्यांनी सर्व प्रकारची पुस्तके मला पुरविली व अजूनही ते तशीच पुरवितात. पुणे विद्यापीठाचे ग्रंथपाल श्री. हिंगवे यांनी तर माझा विषय सतत मनात वागवून त्या दृष्टीने उपयुक्त अशा ग्रंथांचे व लेखांचे एक टाचणच करून ठेविले होते आणि हे साहित्य घरी पोचविण्याचीही व्यवस्था केली होती. माझे मित्र 'भारतीय संस्कृतिकोश' चे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांनी आपले ग्रंथालयही मला नित्य खुले ठेविलेले आहे. 'केसरी-मराठा' ग्रंथालयाचे श्री. शंकरराव बरवे यांनीही वेळोवेळी तेथले ग्रंथ मला उपलब्ध करून दिले आहेत. इंग्लंड,