पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशा परिस्थितीखाली हिंदुस्थानच्या राज्यकारभारात काही दिखाऊ सुधारणा घडून आल्याने हिंदुस्थानास राजकीय स्वांतत्र्य मिळाले असे ह्मणता येणार नाही. तर आपल्या देशात ऐतिहासिक दृष्टया अवश्य होणारी क्रांति ज्या परकीय द्रव्याने स्थगित केली आहे, त्या द्रव्याच्या दूरीकरणानेच आह्मास राज्यनैतिक स्वातंत्र्य मिळेल. यूरोपमधली राष्ट्रे आज आपल्याला अर्वाचीन सुधारणेच्या अग्रभागी असलेली दिसून येतात. याला कारण त्या देशात १८ व्या आणि १९ व्या शतकात काही क्रांतिकारी बदल घडून आले; तशा त-हेचे बदल घडून आणणारी राजपद्धति आपल्या देशात हवी आहे. तेव्हा हिंदी राष्ट्रवाद याचा व्यापक अर्थ ब्रिटिश सरकारच्या जागी दुसरे कोणते तरी सरकार प्रचलित करणे असा नाही.तर राष्ट्रवाद या शब्दाने अख्या राष्ट्राची प्रगति आणि उत्कर्ष या बद्दलची प्रेरणा ध्वनित होते. त्या प्रेरणेला संपूर्ण वाव मिळाल्याशिवाय व देशाच्या प्रगतीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्याशिवाय राष्ट्रवादाच्या कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे असे हाणता येणार नाही. परकीय सरकार हे आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील प्रमुख धोंड आहे असे ह्मणणे भाग आहे. कारण जुन्या जीर्ण झालेल्या हिंदी सामाजिक संस्थांचे ते आतापर्यंत संरक्षक किल्ला बनलेले आहे; मृत्युपंथास लागलेल्या सामाजिक संबंधाना त्या सरकारने चकाकी आणलेली आहे; १८ व्या शतकात उदित झालेल्या पुरोगामी सामाजिक शक्तींचे उन्मूलन करून हिंदी राष्ट्राचा विकास सतत दोनशे वर्षे थोपवून धरलेला आहे. सारांश, राष्ट्रवादाला आपल्या देशात क्रांतिकारी महत्त्व प्राप्त झालेले आहे; आणि राष्ट्रवादी चळवळ ही क्रांतिकारी चळवळ बनलेली आहे. काही तुटपुंज्या राजकीय सुधारणा मोठ्या मुष्किलीने मिळविण हे हिंदी राष्ट्रवादाचे उद्दिष्ट नाही आहे. हिंदी राष्ट्रवाद या शद्वात प्रचंड सामाजिक अर्थ भरलेला आहे. त्या राष्ट्रवादाच्या विजयाने आपल्या राष्ट्रीय जीवनाच्या सर्व अंगोपांगात प्रचंड क्रांति घडून येणार आहे, ह्मणूनच हिंदी ।