पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्य आणि वेदांत. ७१

ज्ञान मनुष्याच्या मेंदूच्या उपाधींत सांपडले म्हणजे अंतर्ज्ञान, विवेचकबुद्धि, उपजतबुद्धि इत्यादि रूपाने प्रकट होतें. उपाधिभेदाने त्याच्यांत कमी अधिकपणाचा प्रत्यय येतो. उपाधि ज्या मानाने जड, अथवा सूक्ष्म असेल त्या मानानें तेंही जड अथवा सूक्ष्म भासू लागते. आत्मा या मूलरूपाने पाहता त्यांत कोणताही कमी अधिकपणा नाही अथवा त्यांत कसला भेदही नाही. आत्मा या रूपाने अत्यंत हीन स्वरूपाचा पशु आणि अत्यंत श्रेष्ठ मनुष्य यांत कसलाच भेद नाही. आपणांस फरक म्हणून जो भासतो त्यांतील मुद्दा इतकाच की पशूच्या मेंदूची वाढ चांगली झाली नसल्यामुळे त्याच्यांतून हा प्रकाश हीन रूपाने प्रकट होतो; आणि याच हीन रूपाला आपण उपजतबुद्धि असें नांव देतो. मूळ प्रकाश अत्यंत उज्ज्वल असतांही ज्या भिंगाच्या द्वारें तो प्रकट होतो तें भिंग अत्यंत मलिन असल्यामुळे प्रकाशाच्या प्रकटीकरणास पुरेसा वाव मिळत नाही. यामुळे तो हीन भासतो. मनुष्याचा मेंदू याहून फार श्रेष्ठ प्रतीचा आहे. यामुळे त्यांतून हाच प्रकाश अधिक उज्ज्वल स्वरूपाने बाहेर पडतो. सामान्यप्रतीच्या मनुष्यांत हाच प्रकाश सामान्य उज्ज्वल दिसतो आणि अत्युच्च प्रतीच्या मनुष्यांत तोच संपूर्ण तेजानें प्रकाशत असतो. दोहोंतील मूळ प्रकाश एकच असून उपाधिभेदाने त्यांत कमी अधिकपणा दिसतो.
 सत् म्हणजे अस्तित्व; यालाही हाच नियम लागू आहे. सत् हा आत्म्याचा मूलस्वभाव आहे. त्याला मर्यादा नाही. आपल्याला अस्तित्व म्हणून जे दिसतें तें आकुंचित अथवा मर्यादित असून याच अमर्याद सद्रूपाचें तें प्रतिबिंब आहे. अशा रीतीने सत्, चित् आणि आनंद ही तीन रूपें व्यक्तदशेला येतांना मर्यादित होतात. व्यक्तदशा आणि मर्यादा या दोन वस्तू परस्परांशी पक्क्या बांधलेल्या आहेत. व्यक्तदशा आणि मर्यादा यांना सुरवात एकाच वेळी होते. कोणतेही अव्यक्त रूप व्यक्तदशेला येऊ लागले की त्याभोंवतीं मर्यादेची भिंत उभारली जाते; पण व्यक्तदशेत अनुभवास येणारी मर्यादा मूल रूपाला लागू नसते. मूल रूप स्वयंभू, अमिश्र आणि अमर्याद असते. आनंदरूप अमर्याद आहे; परंतु प्रेमाला मर्यादा आहे. एके दिवशी तुम्हांवर मी प्रेम करतो आणि दुसऱ्याच दिवशी तुमचा द्वेषही मी करूं लागतो. ज्या प्रेमांत अशा रीतीने खंड पडू शकतो तें प्रेम अनंत आहे काय? एखादे