पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

दिवशी माझ्या प्रेमाला भरती येते तर दुसऱ्या दिवशी ओहोटीस सुरवात होते. या भरतीओहोटीचे कारण हेच की प्रेम स्वयंभू नाही. ते मर्यादित, मिश्र आणि उपाधिबद्ध रूप आहे. यामुळे उपाधींत कमीअधिकपणा झाला की त्यालाही ओहोटी लागते अथवा भरती येते हे रास्तच आहे.

 श्रीकपिलांच्या विचारसरणींत आमच्या दृष्टीने आक्षेपार्ह असा जो पहिला मुद्दा आहे तो त्यांची ईश्वरविषयक कल्पना हा होय. कपिलांस ईश्वराचें अस्तित्व मान्य नाही. आता येथे काय घोंटाळा उपस्थित होतो पहा! व्यष्टिरूप व्यक्तींत प्रकृतीची बुद्धयादि रूपे असून अखेरीस जडदेह असतो आणि या सर्वांच्या मागें पुरुष असतो. हा पुरुष या सर्वांचे अधिष्ठान असून त्यांचा शास्ताही तोच असतो. त्याचप्रमाणे समष्टिरूप विश्वांतही समष्टिरूप बुद्धि अथवा महत् हे तत्त्व असून त्याच्या रूपांतराच्या द्वारे समष्टिरूप अहंकार, समष्टिरूप मन व सर्व समष्टिरूप सूक्ष्म आणि स्थूल विश्व निर्माण होते. असें आहे तर व्यष्टीच्या मागें ज्याप्रमाणे पुरुषाचे अस्तित्व असते त्याचप्रमाणे या समष्टीच्या मागेही पुरुषाचे अस्तित्व मानावयास नको काय ? व्यष्टीच्या मागे पुरुषाचे अधिष्ठान असते, त्याप्रमाणे समष्टीच्या मागे कांहींच अधिष्ठान नसेल, तर ही सारी समष्टि कसल्या आधारावर दृश्यतेस येते ? याकरितां व्यष्टीप्रमाणेच समष्टीलाही अधिष्ठान आणि शास्ता हा पाहिजेच. असें नसेल तर प्रकृतीने उभारलेली ही सारी परंपरा अधांतरी लोंबते असे होईल. समष्टीच्या मागे पुरुष नाही असे तुम्ही म्हणाल तर व्यष्टीच्याही मागे त्याचे अस्तित्व नाही असे आम्ही म्हणूं. व्यष्टीच्या अनेक रूपांच्या शृंखलेमागे पुरुष हे रूप असून ते त्या साऱ्या शृंखलेहून वेगळे व मुक्त आहे असें ज्या आधाराने तुम्ही सिद्ध करूं पाहतां त्याच आधाराने समष्टीच्या मागेही तेच रूप असले पाहिजे असे आम्ही म्हटल्यास त्यांत वावगे काय आहे ? मिश्र आणि मर्यादित व्यष्टीच्या मागे अमिश्र, अमर्याद आणि स्वयंभू पुरुष असला पाहिजे हे ज्या बुद्धिवादाने तुम्ही सिद्ध करतां त्याच बुद्धिवादाने समष्टीच्या मागेही असेंच अमिश्र, अमर्याद आणि स्वयंभू रूप असले पाहिजे असें आम्ही म्हणतों. प्रकृतीच्या समष्टिरूप विश्वाच्या मागे जें अमिश्र, अमर्याद आणि स्वयंभू रूप आहे त्यालाच ईश्वर असें नांव आम्ही देतो आणि तोच त्या साऱ्या समष्टींचा शास्ता आहे असे म्हणतों.