पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम

वयाची. आपण परस्परांपासून भिन्न आहों असें वाटणे हा भ्रम आहे. यालाच माया म्हणतात. यापासूनच पुढे भीतीची उत्पत्ति होते, आणि ती भीतीही अनेक दुःखांस कारण होत असते. एक मनुष्य दुसऱ्यावर उपकार करतो तो कां ? आपल्या सुखाच्या आड तो दुसरा येतो असें त्याला वाटते म्हणून. त्याने जेवढे सुख भोगले तेवढें आपलें कमी झाले असें त्याला वाटत असते. एखाद्या श्रीमंताकडे पाहून दुसऱ्या एखाद्याच्या मनांत अशी कल्पना उभी राहते की याने सारा पैसा अशा रीतीने एकत्र कोंडून ठेवला नसता तर त्यांतला अंश आपणाकडे आला असता. हा श्रीमंत झाला हेच आपल्या दारिद्याचे कारण आहे, असे त्याला वाटू लागते. या कल्पनेने त्याच्या चित्तांत बिऱ्हाड केले की भीति आणि द्वेष असले विकार तेथें आपोआप उद्भवतात व त्याजकडून भयंकर कृत्ये करवितात. श्रीमंतांना लुटणे न्याय्य आहे असे त्याला वाटू लागते. तो चोऱ्यामाऱ्या बिनदिक्कत करूं लागतो. आपण सारे एकरूप आहों ही खूणगांठ ज्याला पटली, त्याच्या ठिकाणी भीति तरी कोठून राहील ? हे सारे विश्व मीच आहे असा अनुभव मला आला म्हणजे यांतील प्रत्येक वस्तु मीच होणार. माझ्या मस्तकावर वज्रप्रहार झाला तरी वज्र मीच, कारण सारें अस्तित्वच जर मी, तर वज्र तरी माझ्याबाहेर कोठे राहील ? मला भयंकर तापाने पछाडलें तरी तो ताप मीच. माझ्यासमोर एखादा वाघ उभा राहिला तरी मला भीति कशाची ? कारण तो वाघही मीच. प्रत्यक्ष मृत्यूचीही भीति मला शिवावयाची नाहीं; कारण मृत्यूही मीच. मीच जीवित आणि मीच मृत्यु. विश्वांत एक नसून दोन आहेत या कल्पनेच्या जन्माबरोबरच भीतीचाही जन्म होतो हे आपण ध्यानांत आणा. ' सर्वांनी परस्परांवर प्रीति करावी ' हा उपदेश आपल्या कानावर नेहमी आदळतो; पण अशी प्रीति आपण कां करावी, या प्रश्नाचें जें उत्तर आम्ही देतों तें हेंच की तूं आणि तो एकच आहांत. म्हणून सर्व विश्व अशा रीतीने एकरूप आहे. या दृश्य विविधतेच्या पोटी ऐक्य आहे. माझ्या भावावर मी प्रेम कां करावें ? मी आणि माझा भाऊ एकच आहों म्हणून. सर्व विश्व एकरूप आहे. आपल्या पायांखालून सरपटत असणान्या अत्यंत क्षुद अशा कीटकापासून तो थेट देवापर्यंत सर्वांची शरीरे वेगवेगळ्या स्वरूपाची दिसत असली तरी वस्तुतः त्यांच्यांत परम ऐक्य आहे. परमात्मरूपाने हे सारे प्राणी एकच आहेत.