पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम्


खरोखरच सत्य वस्तूकडे जाणारा असेल, तर त्याचा विजय झालाच पाहिजे. दिवा पेटविल्यानंतर अंधार नाहीसा व्हावा यांत नवल काय ? आपल्या देशांतील लोकांना खरें धर्मज्ञान मिळावे अशी तुमची वास्तविक इच्छा असेल, तर ती याच मार्गानें तृप्त होईल. तुम्ही करितां तें वाईट आहे असे त्यांना सांगून त्यांच्यावर वेळी अवेळी तोंड टाकून अथवा त्यांच्याशी भांडणे करून इष्टकार्यसिद्धि केव्हाही होणार नाही. सत्याला केव्हांच मरण नाही. सत्याचा प्रकाश प्रत्येकाच्या ठिकाणी जिवंत आहे. सत्यवस्तूला आनंदाने मिठी मारण्याची त्याची नेहमीच तयारी असते. ती वस्तु त्याच्या नजरेसमोर तुम्ही येऊ देत नाही हा तुमचा दोष.
 त्या सनातन स्वरूपाचा आशीर्वाद तुम्हांवर सदा असो. तो उत्पत्तिस्थि तिलयकर्ता तुम्हांवर सदा संतुष्ट असो. ज्याने हिंदु कुलाचे आजवर रक्षण केले, ज्याला विष्णु, शिव, शक्ति, गणपति इत्यादि अनेक नांवें आहेत, ज्याची सगुण अथवा निर्गुण उपासना तुम्ही करिता, 'एकं सत् विप्रा बहुधा वदंति' असें ज्याचे वर्णन आपल्या पूर्वजांनी केले, त्याचा प्रकाश आपणां सर्वांच्या हृदयांत प्रवेश करो. स्वार्थत्यागपूर्वक आणि अत्यंत प्रेमाने परस्परांस साहाय्य करण्याची बुद्धि आपणांस तो देवो. मोठे नांव, पुष्कळ पैसा अथवा वैयक्तिक थोरवी यांचा वासहि आपल्या चित्तास न लागो. केवळ भरतभूमीच्या पुनरुज्जीवनाकडे आमच्या सर्व कार्यांचा ओघ वळो अणि त्याजवर त्या मंग

लमयाचा पूर्ण आशीर्वाद असो.