पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


तुम्हीं जिंकिला नाही." ही गोष्ट अक्षरशः खरी आहे. पण ती इंग्रजांच्या दृष्टीने मात्र खरी आहे हे लक्ष्यात ठेविले पाहिजे. शूर, धाडसी आणि तरवार परजणान्या क्षत्रियाच्या दृष्टीने देश जिंकणे हीच नरजन्माची इतिकर्तव्यता होय. त्याच्या दृष्टीने आम्ही निर्माल्यवत् दिसलों तर त्यांत नवल नाही; पण आमच्या दृष्टीने हीच परिस्थिति आम्हांस उलटी दिसते. हिंदुस्थानदेश सर्वश्रेष्ठ का, असा प्रश्न माझ्या चित्तांत उभा राहिला, तर त्याने कोणास जिंकलें नाही म्हणून, हेच उत्तर मला मिळतें. आमची मोठी प्रतिष्ठा हीच. हिंदुधर्म जेता नाही म्हणून तो दुबळा आणि त्याज्य आहे, अशी त्याची नालस्ती प्रत्यही तुमच्या कानी येते; आणि मोठ्या दुःखाची गोष्ट ही की, स्वतःस ज्ञानसंपन्न म्हणविणारी कांही चांगली माणसेंहि अशा प्रकारची नालस्ती करीत असतात. हिंदुधर्म जेता नाही हेच त्याच्या खरे पणाचे स्पष्ट लक्षण आहे असे मला वाटते. हिंदुधर्माने कधी तरवार पर जिली नाही, आणि कधीं रक्तपातही केला नाही. याचे कारण हेच की, त्याच्या मुखांतून फक्त आशीर्वादाचे शब्द बाहेर पडतात. 'शांतिः पुष्टिस्तु ष्टिश्चास्तु' या एकाच महामंत्राचा जप हिंदुधर्मानें आजवर केला आहे. सर्वां बद्दल सहानुकंपा आणि प्रेम एवढयाच भावना त्याच्या चित्तांत आहेत. परमत सहिष्णुता प्रथम येथेच उदयास आली. तिचा वास साऱ्या जगांत दुसऱ्या कोठेहि नव्हता. प्रत्यक्ष व्यवहारांत तिचे स्वरूप प्रथम येथेच व्यक्त झालें. बाह्य देशी तिचें नांवही कोणास ठाऊक नव्हते. दुसऱ्या देशांत ही फक्त पुस्तकी विद्या आहे. लेख आणि भाषणे यांवाचून दुसन्या कोठेहि तिच्या अस्तित्वाचा प्रत्यय तुम्हांस यावयाचा नाही. ख्रिस्ती लोकांकरितां चर्चे आणि मुसलमानांकरितां मशिदी हिंदूंनी बांधाव्या ही गोष्ट फक्त हिंदुस्थानांतच शक्य आहे. अशा रीतीने हा धर्मसंदेश हिंदुस्थानांतून अनेक वेळां बाह्य देशी गेला आहे आणि त्याचे कार्य इतक्या शांतपणे चालले आहे की, ते कोणाच्या दृष्टिपथांतहि येत नाही. हिंदुस्थानाची मनोभूमिकाच अशा प्रकारची आहे. तिला गडबड आणि धडपड हीं खपायची नाहींत. हिंदुस्थानांतील धर्माची वाढ शुद्ध शांतीच्या साम्राज्यांत झाली आणि त्याच्यामागे जे सामर्थ्य आहे तें दंडाच्या रूपाने केव्हाही व्यक्तदशेला आले नाही. दुसऱ्यांची मनें हरण करून आपली छाप त्याने त्यांजवर पाडली. एखाद्या विदेशीयाने आमच्या