पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] आपणांपुढील कार्य. २३१


मीच्या राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे हे पहिले चिह्न होते. जे पुनरुज्जीवन आंतून होऊ लागले होते, त्याला आता बाहेर पडण्यावांचून गत्यंतरच नव्हते. याकरितां, हा प्रवास मला टाळतां येण्यासारखाच नव्हता. जगाच्या ज्ञानांत जी कांहीं भर भरतभूमीने घालणें अवश्य होते ती घालण्याचा उपक्रम अशा रीतीने आतां सुरू झाला आहे. हिंदुस्थानांतील ज्ञानाचा प्रवाह बाह्यदेशी जाऊन वाहूं लागण्याची ही गोष्ट आजच प्रथम घडत आहे असें नाहीं. हिंदु लोक आपल्या सरहद्दीच्या चार भिंतींच्या आंत सदोदितचे कोंडलेले होते. असें तुम्हांपैकी कोणास वाटत असेल तर ती त्याची मोठी चूक आहे. विस्तृत ग्रंथभांडार न पाहिल्याचा हा परिणाम होय. कोणाला असे वाटते याचे कारण हेच की, त्याने हिंदुकुलाच्या संस्कृतीचा अभ्यासच केलेला नाही. तिचे बाल्य आणि तिची वाढ ही कशी झाली हे त्याला ठाऊक नसल्यामुळेच तो काही तरी बरळत सुटतो. कोणत्याही राष्ट्राला जगावयाचे असेल तर त्याने देवाण घेवाण केलीच पाहिजे. तुम्ही काही दिल्यावांचून तुम्हांस काही मिळावयाचें नाही, आणि तुम्हांस कोणाकडून कांहीं प्राप्त झाले तर त्याची वांटणी इतरांस तुम्ही दिलीच पाहिजे. ज्या अर्थी हिंदुस्थान धडधडीत जिवंत असलेला आपल्या डोळ्यांनी आपण पहातो, त्याअर्थी या गोष्टी त्याने केल्या असल्याच पाहिजेत हे कबूल करावयास नको काय ? हिंदुस्थानांतून बाह्यदेशी ज्ञाननदीचा प्रवाह सदोदित वहात आहे, या गोष्टीची साक्ष हिंदुस्थानदेश जिवंत आहे हीच.
 दुसऱ्यास देतां येण्याजोगी हिंदुस्थानाजवळील वस्तु धर्मज्ञान ही आहे. उच्च तत्त्वज्ञान, पराविद्या आणि धर्मज्ञान या वस्तू इतरांनी हिंदुस्थानापासून घेतल्या पाहिजेत; आणि यांत विशेष हा की, धर्माचा मार्ग साफसूफ करण्यास दुसऱ्या कोणाची मदत त्याला लागत नाही. पराविद्या आणि तत्त्वज्ञान यांना रक्ताची नदी पार होऊन जावे लागत नाही. माणसांची हाडें चुरडीत आपला प्रवास यांना करावा लागत नाही. स्वतःबरोबर तोफा बंदुका घेण्याचे कारण यांना पडत नाही. दंडनीतीचा आश्रय त्यांना करावा लागत नाही. प्रेम आणि शांति या दोन वस्तू बरोबर घेऊन या विद्या साऱ्या जगाचा प्रवास सुखरूप पणे करितात. हिंदुस्थानांतील धर्मविद्या आपले हे कार्य अशाच प्रकारे आज पर्यंत करीत आली आहे. मी लंडन येथे असता एका तरुणीने मला प्रश्न केला “ तुम्ही हिंदूंनी आजपर्यंत काय केले आहे ? एकहि देश आजपर्यंत