पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १९१


कल्याणप्रद होईल. मनापासून केलेले अगदी थोडें धर्माचरणही कितीतरी हितकर होते. 'स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्।' या गीतावच नाचे रहस्य हेच आहे. याकरितां प्रत्येकाने आपल्याकडून होईल तितका या धर्माचा अंश सांठवावा. आपणाकडून महत्कार्य होत नाही ह्मणून हात जोडून स्वस्थ बसू नये. 'शिवोऽहम्' असा जप एखाद्या मासेविक्याने केला तर तो अधिक चांगला मासेविक्या होईल; आणि हाच जप एखाद्या विद्यार्थ्याने केला तर तो अधिक चांगला विद्यार्थी होईल. हाच न्याय सर्वत्र लागू पडतो. कोणी कोणत्याही परिस्थितींतील मनुष्य असला तरी यामुळे त्याची स्थिति न बिघ डतां ती अधिक चांगली होईल.
 आतां अशा रीतीने सर्वच वेदान्ती झाले तर ज्ञातिबंधने तुटून सबगोलंकार होईल, अशी धास्ती कोणास वाटत असेल तर ती अस्थानी आहे. यामुळे जातिभेद नाहींसा न होता तो अधिक बळकट आणि अधिक व्यवस्थित होईल; कारण लहान लहान समाज करून राहावे हा मनुष्याचा स्वभावच आहे. आतां इतकी गोष्ट मात्र खरी की सांप्रत कांहीं जातींना जे विशिष्ट हक्क आहेत ते नष्ट होतील; आणि असे विशिष्ट हक्क नष्ट होण्याने जनसमाजाचें कांहीं नुक- सान होणार नाही. जातिभेद स्वभावसिद्ध आहे म्हणूनच 'चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म विभागशः' असें भगवान् श्रीकृष्णांनी म्हटले आहे. जातिभेद समाजाच्या वाढीला पोषक आहे. तो तिचा विघातक नाही. एखादें काम माझ्या हातून चांगले होईल, तर तुमच्या हातून दुसरे एखादें काम चांगले होईल. तुमचे काम माझ्याने चांगले होणार नाही आणि माझें काम तुम्हांस चांगलेंसें साधणार नाही. देशाचा राज्यकारभार शिस्तवार करण्याची विद्या तुम्हांस अवगत असेल; आणि जुन्या जोड्यांना ठिगळं लावण्याची विद्या मला येत असेल. अशा स्थितीत मला राज्याधिकार दिला आणि तुम्हांस जोडे शिवावयास लावले तर ते योग्य होईल काय? मी जोडे शिवीत असलों आणि तुम्ही वेद पढण्यांत हुशार असला तर तेवढयामुळे माझ्या मस्तका वर पाय देण्याचा अधिकार तुम्हांस प्राप्त होतो काय ? ब्राह्मणाने खून केला तरी तो त्याला माफ आणि शूद्राने एखादी चोरी केली तर त्याला सुळाची शिक्षा हा न्याय कोठला ? असले विशिष्ट हक्क नाहीसे होणे हेच आपल्या साऱ्यांच्या हिताचे आहे. जातिभेद नष्ट होणे चांगलें नाहीं; कारण तो स्व-