पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


त्यांना सांगत असतात. उपाध्यायांच्या या वचनावर इंग्रज लोकांनी खरो- खर विश्वास ठेवला असता, तर आजची त्यांची स्थिति त्यांना कधीही प्राप्त झाली नसती. युरोपांतील इतर देशांची स्थितिही अशीच आहे. ख्रिस्ती उपदेशक अनेक प्रकारच्या भोळ्या गोष्टी त्यांना सांगत असतात. तथापि त्यांचे श्रोते आपल्या मनावर असल्या भाकडकथांचा परिणाम मुळीच होऊ देत नाहीत, आणि आपलें ईश्वरत्वही ते कधी विसरत नाहीत. हे ईश्वरत्व त्यांच्या ठिकाणी अद्यापि जिवंत आहे आणि आपल्या जिवंतपणाची साक्षही तें पटविते. आपली स्थिति याच्या उलट आहे. आपली आत्मश्रद्धा नाहींशी झाली आहे. माझे म्हणणे तुम्हांला कदाचित् खोटे वाटेल, पण मी निश्च याने सांगतों की इंग्रजांपेक्षा आपला आत्मविश्वास फारच हलक्या प्रतीचा आहे. या बाबींत इंग्रज लोक आपणांहून हजार पटीने अधिक श्रेष्ठ आहेत. माझे हे शब्द तुम्हांस कडू लागत असतील; पण काय करावें, खरे आहे तें मला बोललेच पाहिजे. इंग्रज लोकांत धैर्य किती आहे, याचा प्रत्यय आप णांस नेहमी येत नाही काय? आपली धर्मतत्त्वे एखाद्या इंग्रजांला पटलीं की त्यांचा प्रसार करण्याचे वेडच जणूं काय त्यांना लागते. आपले घरदार सोडून ते येथे येतात आणि आमच्याच तत्त्वांचा उपदेश आम्हांस करूं लागतात. या त्यांच्या कृतीबद्दल त्यांच्या देशबांधवांनी त्यांची टर उडविली तरी तिकडे ते लक्ष्य देत नाहीत. तुमच्यापैकी किती जणांच्या हातून असें काम होईल ? असली कामगिरी उचलणारा मनुष्य तुमच्यांत सहसा मिळा- वयाचा नाही. असें कां ? काय, तुमची धर्मतत्त्वें तुम्हांस अवगत नाहीत ? या बाबींत तुमचे ज्ञान त्यांच्याहून खास अधिक आहे. किंबहुना, तुमचें फाजील शहाणपणच तुम्हांस नडतें. वाजवीहून अधिक शहाणे तुम्ही आहां हेच तुमचे मोठे दुर्दैव आहे. याचे कारण हेंच की तुमचें रक्त पाण्यासारखें पातळ आहे. तुमचा मेंदू शिथिल झाला आहे आणि तुमचा देह अशक्त आहे. यांत आता तुम्ही बदल केला पाहिजे. दुबळ्या देहामुळेच सांप्रतचे कष्ट तुम्ही भोगीत आहा. तुमच्या साऱ्या अधोगतीचे कारण तुमचे देहदौ बल्य हे एकच आहे. सुधारणांच्या गोष्टी तुम्ही तोंडाने सांगतां. आमचे ध्येय अमुक आहे अशी बडबड तुम्ही करता. गेली शंभर वर्षे बडबडीवां चून दुसरे कांहींच तुम्ही केले नाही. कृतीची वेळ आली तेव्हा तुम्ही अशी