पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ]हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.१८९


दडी दिली की तुमचा शोधच कोठे लागेना. आपल्या अशा कृतींनी सा-या जगभर तुम्ही आपली छीःथू करून घेतली आहे. सुधारणा या शब्दाचा अर्थ- सुद्धा तुम्हीं नाहींसा करून टाकला. असें कां व्हावें ? याचे कारण तुमच्या लक्ष्यांत येत नाही काय ? या गोष्टी तुम्हांस समजत नाहीत असे नाही. यांतील कार्यकारणभाव तुम्हांस चांगला समजतो. आपलें दौर्बल्य आप णांस जेथें तेथें नडते. तुमचे शरीर अशक्त आणि मनही अशक्त. आत्म श्रद्धा कशी ती तुम्हांस ठाऊकच नाही. गेली कित्येक शतकें चालीरीतींच्या, जातिभेदाच्या, राजांच्या आणि परकीयांच्या अंमलाखाली तुम्ही निःसत्व बनून गेला आहां. माझ्या बंधूंनो, तुमच्याच जातभाईंनी तुमचे सत्वहरण केले आहे. तुमच्या पाठीचा कणा मोडून गेला आहे. पायाखाली सरपट-- णाऱ्या किडयांच्या पंक्तीला तुम्ही गेलेले आहा. तुम्हांला सामर्थ्याची देणगी कोण देणार ? मी तुम्हांला पुनःपुन्हां हेच सांगतों की बाबांनो, सुदृढ व्हा. आज आपणाला जर कोणत्या वस्तूची जरूर असेल तर ती शक्तीचीच आहे; आणि हे साधण्याकरितां 'अहं ब्रम्हास्मि' या मंत्राचा जप ही पहिली पायरी आहे. उपनिषदांचा अभ्यास करून हेच तत्व प्रथम मुखोद्गत करा. "मला शस्त्र कापू शकत नाही, अग्नि जाळू शकत नाही, वायू शोषू शकत नाही; मी सर्वशक्ति आहे." या मंगलमय मंत्राचा जप नित्य नित्य करीत जा. हाच तुमचा तारक मंत्र आहे. “मी दुर्बल, माझ्याने काय होणार ?" अशी अक्षरेंसुद्धा तोंडावाटे कधी काढू नका. 'कर्तुमकर्तुम् अन्यथा कर्तुं' असे माझें सामर्थ्य आहे असे म्हणत जा. आपणाला करण्यास अशक्य असें या जगांत काय आहे ? वाटेल ती गोष्ट आपण करूं. आत्मा सर्वशक्तिमान् आहे. पण या गोष्टीचा विसर आपणांस पडला आहे. आतां ही गेलेली श्रद्धा पुन्हां परत आणली पाहिजे. नाचिकेताची कथा ध्यानात आणा. बापाने यज्ञ केला तेव्हां नाचिकेताची श्रद्धा जागृत झाली. याच श्रद्धेची प्राप्ति आपणांपैकी प्रत्येकास प्राप्त झाली तर काय बहार होईल! तुमच्यापैकी प्रत्येक जण उठेल आणि जग हालवून सोडील. तुमचे अनंत परमात्मरूप व्यक्तदशेला येईल. असे व्हावे इतकीच माझी इच्छा आहे. हे सामर्थ्य आणि ही श्रद्धा या वस्तू उपनिषदांपासून तुह्मांस प्राप्त होणाऱ्या आहेत.
 पण इतके दिवस ही विद्या केवल संन्याशांच्या हाती राहिली होती. हे मोठे

रहस्य त्यांनी गुप्त राखिले. हे रहस्य उराशी बाळगून ते अरण्यांत दडी देत.