पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
खंड.]
भक्ति.

१४७


नसल्यामुळेच एवढें रणकंदन त्यांच्यांत माजले होते. कारण त्यांना अनुभव असता, तर असल्या कोरडया वादाला काही जागाच उरती ना. पाण्याने घट भरूं लागला म्हणजे बुडबुड असा आवाज तो करतो; पण एकदां तो पूर्ण भरला ह्मणजे हा आवाज निघत नाही. त्याचप्रमाणे ज्याचे चित्त परमा- त्मामय झाले त्याच्या तोंडाला आपोआप कुलूप लागते. अनेक पंथांत मोठया कडाक्याचे वादविवाद सुरू आहेत याचा अर्थच हा की, त्यांपैकी प्रत्यक्ष अनुभव कोणासही झालेला नाही. तसा अनुभव त्यांस झाला असता, तर असल्या वादाच्या भरीस ते कधीच पडते ना. पुष्कळशी बडबड करणे म्हण- जेच धर्म असा त्यांचा समज होता. ग्रंथ वाचून कांही बडबड केली की यांचा धर्माभ्यास संपला. एखादा पंथप्रवर्तक उठतो आणि भराभर वाक्य लिहून एखादें प्रचंड बाड प्रसिद्ध करतो. या चोपडयांत कांहीं नवीन असतें असे नाही. शेकडों ग्रंथांतील मजकूर त्यांत एकत्र झालेला असतो; पण मजा ही की अमूक मजकूर आपण अमूक ग्रंथांतून घेतला आहे असा नुसता पुसट उल्लेखही हा ग्रंथकार कोठे करीत नाही. त्याची कृतज्ञता पाहिली तर ती असल्या प्रतीची असते. इतकी तयारी करून हा ग्रंथ तो जगावर लोटून देतो आणि आधींच असलेल्या गोंधळांत आणखी भर घालतो..
 वास्तविक पाहतां सामान्य मनुष्यांपैकी बहुतेक निरीश्वरवादी असतात. ईश्वराचे अस्तित्व तोंडाने ते कबूल करतात; पण त्यांची प्रत्यक्ष वागणूक पाहिली तर तीवरून त्यांची गणना नास्तिकांच्या कोटींतच करावी लागेल. या नास्तिक मंडळींतच आणखी एक नवा पोटवर्ग युरोपांत उत्पन्न झाला आहे. हा वर्ग जडवाद्यांचा होय. असा वर्ग एक निराळा पंथ या रूपाने अस्तित्वात आला ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. हे लोक उघडपणे नास्तिक मतांचे प्रतिपादन करितात. तोंडाने ईश्वराचे अस्तित्व कबूल करावे आणि हाताने त्याचा उच्छेद करावा, असल्या दांभिकपणापेक्षा 'चाले तैसा बोले' हा मार्ग अधिक श्रेयस्कर आहे हे उघड आहे. तोंडाने ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल कडाक्याचा वाद करून त्याच्या उलट वर्तणूक करणाऱ्या बोके संन्याशांपेक्षा असले चकचकीत नास्तिक शतपट बरे. “मागा म्हणजे मिळेल; शोधा म्हणजे सांपडेल; ठोका म्हणजे उघडेल" ही ख्रिस्ताची वचनें तुम्हांस ठाऊक असतीलच. या वचनांत नितांत सत्य भरले आहे. यांत कांहीं रूपक नाहीं;