पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ नवम


अथवा कोठे शब्दच्छल नाही. सारे सत्य अगदी उघड्या शब्दांनी सांगितले आहे. यांत परमात्म्याच्या एका महा अवताराचे हृदय त्याच्या मुखावाटे वाहले आहे. हे शब्द म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचें फळ होय. जसें प्रत्यक्ष अनुभविलें तसेंच ख्रिस्ताने बोलून दाखविलें. परमेश्वराचे अस्तित्व त्याच्या तोंडांत नव्हते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या हृदयांत त्याने घेतला होता. परमेश्वराशी तो बोलत होता आणि परमेश्वराच्या संनिध त्याचा वास होता. घरें, झाडे आणि इतर सृष्ट पदार्थ आपणास जितक्या सत्यत्वाने दिसतात, त्याहून अधिक सत्यत्वानें परमेश्वर ख्रिस्ताला दिसत होता. परमेश्वराच्या भेटीची खरी तळमळ कोणाला लागली आहे, इतकाच काय तो प्रश्न आहे. जगांतल्या या साऱ्या माणसांना त्याच्या भेटीची इच्छा असतांही तो त्यांस प्राप्त होत नाही असें तुम्हांस वाटते काय ? असे होणे शक्य नाही. जी गोष्ट मिळण्याची शक्यता नाही, तिचे अस्तित्व असणेही शक्य नाही. अमुक व्हावें अशी इच्छा आपणास होते याचा अर्थच हा की त्या गोष्टीला आपल्या बाहेर अस्तित्व आहे. ज्या वस्तूला अस्तित्वच नाही तिची इच्छाही होणे शक्य नाही. श्वासोच्छ्वास करण्याची इच्छा मनुष्यास आहे आणि तिच्या तृप्तीकरितां बाहेर हवाही आहे. खाण्याची इच्छा मनुष्याच्या ठिकाणी आहे आणि बाहेर अन्नही आहे. श्वासोच्छ्वास करावा आणि अन्न खावें अशी इच्छा मनुष्याला कां होते ? तिच्या तृप्तीची तजवीज अगोदर तयार आहे म्हणून. प्रकाशाचें अस्तित्व अगोदर असते आणि नंतर डोळे उत्पन्न होतात. प्रकाशानेच डोळे उत्पन्न केले असें म्हणावयास हरकत नाही. ध्वनि अगोदर आणि कानाची उत्पत्ति मागाहून झाली आहे. अशाच रीतीने बाह्य वस्तूंनी मनुष्याच्या मनां- तील साऱ्या वासना निर्माण केल्या आहेत. सृष्टिनियमांचे उल्लंघन करावें, प्रकृतीच्या कायद्याबाहेर जावें, ही सारी बंधनें तोडून मुक्त व्हावे ही इच्छा तरी मनुष्याच्या हृदयांत कोठून उत्पन्न होते ? आपल्या पारतंत्र्याचा प्रत्यय प्रत्येक क्षणी येत असतां स्वतंत्र व्हावें ही इच्छा आपल्या हृदयांत मगरमिठी मारून बसली आहे तें कां ? कांही झाले तरी आपली ही इच्छा आपल्या हृदयांत जीव धरून राहते. अशी तीव्र तळमळ ज्याला लागली असेल तो अवश्यमेव मुक्त होईल-आपले ध्येय तो खचीत गांठील; पण अशी खरी इच्छा कोणाला आहे ? बहुधा कोणालाही नाही असेंच म्हणणे भागास येतें.