पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम

आपल्याभोंवतीं अनंत दुःख पसरले आहे. अवनतावस्थेच्या तळाशी आपण गेलो आहों; पण अशा प्रसंगीही आपल्याला आशेचा एक किरण प्राप्त झाला आहे. तो किरण हाच की आपलें सत्यरूप कधीहि नष्ट होत नाही. जें खरोखर आपले म्हणून काही आहे तें आपणापासून कायमचे हिरावून घेण्याचे सामर्थ्य कोणासही नाही. ते आपणापासून कधीहो नष्ट व्हावयाचें नाहीं. आपले अस्तित्व हरवून टाकणे आपणास शक्यच नाही. मला अस्तित्व नाहीं असें कोणासही वाटणे शक्य आहे काय ? मी बरावाईट कसाही असों, पण माझे अस्तित्व आहे म्हणूनच त्यावर बरा अथवा वाईट हे गुण आरूढ झाले आहेत. माझें अस्तित्व नसते तर हे गुण कोठे राहिले असते ? माझें अस्तित्व प्रथम असते आणि नंतर त्यावर बरा अथवा वाईट या गुणांची पुटें बसून मी बरा अथवा वाईट दिसू लागतो. अस्तित्वाचे स्वरूप चिरंतन आहे. आदिअंती तेंच अस्तित्व आहे ! आणि मध्यंतरीही तेंच अस्तित्व आहे, तें कधीही नष्ट होत नाही. तें नाहीं असा एक क्षणही नाही.
 आपणा सर्वांच्या आशेचा तंतु हाच आहे. कोणालाही मृत्यु नाही. त्याचप्रमाणे कायमची अवनतावस्थाही कोणाला नाही. आपलें चालू जीवित हैं एखाद्या मोठ्या खेळखान्यासारखें. तेथे अनेक प्रकारचे खेळ आपण खेळत आहों. यांत चाललेले तमाशे कितीही ग्राम्य असले तरी त्यांचा संबंध आपल्या सत्यरूपाशी कायमचा नाही. येथे कितीही धक्के आणि चपेटे आपणास खावे लागले आणि जीवितौघाच्या लाटांबरोबर वाहात जाण्याचे प्रसंग आपणावर कितीही आले तथापि त्यांचा संपर्क आपल्या आत्म्यास होत नाही आणि त्यांजमुळे त्याला काही इजाही होऊ शकत नाही. आपण अनंतरूप आहों.
"न मृत्युर्न शंका न मे जातिभेदः । पिता नैव मे नैव माता च जन्म ॥
न बंधुन मित्रं गुरुनैव शिष्यः । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ। मदो नैव मे नैव मात्सर्य भावः ॥
न धर्मो न अर्थो न कामो न मोक्षः। चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥"
 साऱ्या रोगांवर हा मोठा रामबाण उपाय आहे. मृत्यूला जिंकणारी अमृत मात्रा हीच आहे. आपण या जगांत आलो आहों या गोष्टीचा मोठा विषाद वाटून तींतून सुटण्यासाठी आपण धडपड करीत आहों. पण ही धडपड करीत असतां चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ' हा मंत्र आपण जपूं या.