पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] एक उघडे रहस्य. ११

"न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् । न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः॥
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता। चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥"
 शरीर कोणत्याही अवस्थेत असो; मन कसेंही शतधा विदीर्ण झालेले असो; सभोंवती कितीही गडद अंधकार पडलेला असो; अथवा परिस्थिति कितीही निराशाजनक असो; हा मंत्र एकदां, दोनदा, तीनदां सहस्रवेळां म्हणत जा, म्हणजे प्रकाशाची प्राप्ति होईल. हे किरण फार हळू हळू प्रवास. करीत असतात; पण केव्हां ना केव्हां तरी ते आपल्यापर्यंत येऊन पोहोंचतील.
 अगदीं मृत्युमुखांत जाण्याचे असे किती तरी प्रसंग मजवर आले. अन्नपाण्यावांचून दीर्घकाल काढण्याचे प्रसंग मी पाहिले. चालता चालता माझ्या पायाच्या चाळणी व्हाव्या, दिवसचे दिवस अन्नाची गांठ पडूं नये, आणि थकवा तर इतका यावा की पुढे पाऊलसुद्धा टाकण्याची शक्ति मला उरू नये. असे झाले म्हणजे एखाद्या झाडाखाली मी अंग टाकी. आता आपल्या आयुष्याची अखेर खास होते असे मला वाटे. बोलण्याची शक्ति माझ्या अंगी अशा वेळी कोठून राहणार ? अखेरीस माझी विचारशक्तिही थांबे. इतके झाले. तरी शेवटी मन पुन्हां उलट खाऊन 'न मे मृत्युशंका' हा जप जपूं लागे.. ही सारी सृष्टि माझ्याविरुद्ध एकवटली तरी काय होणार ? ती मला चिरडू शकत नाहीं; कारण ती माझ्या घरची दासी आहे. हे देवाधिदेवा, तूं आपलें सामर्थ्य प्रत्यक्ष प्रत्ययास आण. तुझें नष्ट झालेले साम्राज्य तूं पुन्हां मिळव. उठ, उभा रहा आणि मुक्कामाला पोहोचेपर्यंत वाटेत कोठेही थांबू नको. या विचारांनी मी ताजातवाना होई, माझ्या चित्ताला नवा दम येई. अनेक भयंकर प्रसंगांतून मी जगलों आणि आज तुमच्या सेवेस हजर आहे याचे श्रेय याच विचारश्रेणीला आहे. याकरितां ज्या ज्या वेळी तुम्हांस संकटसमय प्राप्त होईल त्या त्या वेळी हा मंत्र जपत जा, म्हणजे सारी संकटे नाहीशी होतील. असे होणे हे रीतसरच आहे; कारण वस्तुस्थिति अशी आहे की जीवित हे स्वप्न आहे. अडचणी पर्वतप्राय भासल्या आणि भोंवतालची परिस्थिति कितीही भयंकर आणि निराशेची दिसली तरी ती शुद्ध माया आहे. तिला तुम्ही भिऊ नका, म्हणजे ती ताबडतोब पळ काढील. तिच्या डोक्यावर पाय द्या म्हणजे तिचा चक्काचूर होईल. तुमच्या