पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

शास्त्राचा रोखही याच दिशेने आहे. याच मार्गाने आपणही कार्य करू लागलों तर विविधतेचा लय न होतांही ऐक्यप्रवृत्ति वाढेल.

 सांप्रत दिसणारी सारी विविधता अशीच राहू द्या. त्याला आमची ना नाही; कारण विविधता हे जीविताचे रहस्य आहे. जीवित तीवरच अवलंबून आहे. तुम्ही कदाचित् श्रीमान् व्हाल आणि मी भिकारी राहीन. तुम्ही धष्टपुष्ट असाल आणि मी सुदामदेव असेन. तुम्ही मोठे पंडित असाल आणि मी अक्षरशत्रु असेन. तुम्ही धर्मवेत्ते असाल आणि मी धर्महीन असेन; पण असें असले तरी काय झाले ? आपण एकमेकांच्या आड न येतां आपापल्या विशिष्ट जागी सुखाने राहूं या. तुमच्यापाशी एखादा गुण माझ्याहून अधिक असला म्हणून तेवढयाने तुम्ही माझ्याहून थोर होतां काय ? तुमच्या आणि माझ्या बाह्य स्थितीत जमीन अस्मानाचे अंतर दिसत असले तरी वस्तुतः तुमची व माझी विश्वांतील जागा एकच आहे. तेथे लहानमोठा हा भेद नाही.

 यापुढे नीतिशास्त्राला जें कार्य करावयाचे आहे तें विविधतेचा नाश हे नसून विविधतेच्या पोटी ऐक्य आहे हे ओळखण्याचे आहे. सर्वत्र साम्यावस्था उत्पन्न करावयाची हे काम नीतिशास्त्राचे नव्हे. कारण एक तर हे अशक्य कोटींतले आहे; आणि दुसरे असे की ज्या दिवशी तें सिद्धीस जाईल त्या दिवशी जगाचाही अंत होईल, आणि असे होणे इष्ट नाही. या विविधतेच्या मागे जे ऐक्य आहे तें परमात्मरूप आहे. ते ओळखणे हे त्या शास्त्राचे काम आहे. आज कोणी कितीही दुबळा असला तरी सामर्थ्यांच्या साऱ्या निधीचा तो हक्कदार वारस आहे हे ओळखणे हे नीतिशास्त्राचे काम आहे. बाह्यतः कोणी कितीही पापी दिसत असला तरी तो अनंत आणि पुण्यमयरूपाचा अधिकारी आहे हे जाणणे हे नीतिशास्त्राचे काम आहे. अशा रीतीने या प्रश्नाचा विचार दोन्ही बाजूंनी आपण केला पाहिजे. एकच पक्ष स्वीकारण्याने भावी युद्धाचे बीजारोपण आपण करीत असतो. वस्तुस्थिति आहे तशी साकल्याने पाहणे हेच युक्त आहे. तिची एखादी बाजू पाहून तो एकच पक्ष स्वीकारणे अनर्थास कारण होते. दोन्ही बाजूंचा सारासार विचार करून त्यांतील तत्त्वांशाचे ग्रहण करणे आणि ती तत्त्वे प्रत्यक्ष आचरणांत आणणे हेच आपले कर्तव्य आहे. अशा मार्गाने आपण चाललों तर व्यक्ति दृष्टया आपलें हित होईलच; पण समाजाचे एक घटक या नात्याने समाजहितही साधेल.