पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खासगी पत्रे.
पत्र १ लें.

न्यूयॉर्क, ता. ९ एप्रिल १८९४.

प्रिय --

 सेक्रेटरीसाहेब आपल्या पत्रांत मला तिकडे येण्याविषयी लिहितात. ते म्हणतात, “तुमचे कर्तव्यक्षेत्र हिंदुस्थानच आहे " ही गोष्ट खरी आहे. परंतु साऱ्या हिंदुस्थानभर जागति उत्पन्न होईल असें करावयाचे हे आपणांस लक्षांत ठेविले पाहिजे. यासाठी कोणत्याहि गोष्टींत घाई उपयोगाची नाही. भगवंताची कृपा असेल तर सर्व गोष्टी ठीकठाक होतील.

 अमेरिकेतील पुष्कळ मोठ्या शहरी माझी व्याख्याने झाली. येथे मला मित्रही बरेच मिळाले आहेत, आणि त्यांत कित्येक फार वजनदार गृहस्थ आहेत. आतां ही गोष्ट खरी आहे की, जुन्या पद्धतीचे ख्रिस्ती दीक्षित माझ्याविरुद्ध आहेत. तात्विक विचाराच्या बुद्धिवादांत माझ्याशी दोन हात करणे ही गोष्ट सोपी नाही हे ते पूर्णपणे जाणून असल्यामुळे, माझ्या मार्गात अडथळा आणणे, मला गालिप्रदान करणे व शक्य त्या रीतीने माझी नाचक्की होईलसें करणे, अशा मार्गाचा त्यांनी अंगिकार केला आहे. परमेश्वर त्यांना सुखी करो! कोणतेंहि सत्कार्य आपण करूं लागलों म्हणजे त्यांत अडथळे हे येणारच. असल्या अडथळ्यांनां न जुमानतां एकसारखे पुढे पाऊल टाकणारा धीर पुरुष मात्र नेहमी यशस्वी होतो.

 एक जात, एक धर्म, शांति व मित्रभाव ही ज्या काली जगांत एकत्र नांदूं लागतील तेच सत्वयुग. ही सत्वयुगाची कल्पना भरतभूमीत रुजली म्हणजे तिला जागृति येईल.

 उठा, माझ्या मुलांनो, आणि एकदम या कार्यास लागा!

 जुन्या हिंदुधर्माचा जयजयकार असो ! तुम्ही कामास सुरवात केली की यश हे ठेवलेलेंच. आपण कामास एकवेळ सुरवात केली, की ढोलके बडवणारे वाटेल तितके मिळतील. परंतु कामाशिवाय नुसती बडबड मला नको आहे. ईश्वर आपणांस सुखी राखो.

आपला,

विवेकानंद.