पान:स्वरांत.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्हायची. त्याची झिंग...धुंदी काही अनोखी होती मीरा. तुला नाही असं जाणवत? जीवनातला राप; उबग सारं पार गळून गेलं आहे. तनभर, मनभर पसरली आहे कार्तिकातल्या सुस्नात पहाटेसारखी नखशिखान्त टवटवी. ती टवटवी घेऊन उरलेला संसार नितान्त तृप्तीने करणार आहे मी. पत्र, मग जोडावी लागणारी 'भाभी' 'भैय्या'ची व्यवहारी नाती... छी! छी! या साऱ्यामुळे या नात्यांची बकुळनक्षी विस्कटून जाईल...
 ही ओळख आता इथेच बुझवून टाकायची. मनाच्या खोलखोल तळाशी हा स्वप्न-गंध जपून ठेवायचा.
 ... ही उदासी...मनातला धूर दूर फेकून द्यायचा. नव्या उमेदीनं जीवनात झोकून द्यायचं हं.
 '... मीरा, बी अ गुड गर्ल.'
 तिच्या खांद्याला अपार स्नेहानं थोपटीत राबिन् तिला उठायला लावतो. ती त्याच्याकडे बघते अन् खुदकन हसते. रंगीबेरंगी चिटाच्या घेरदार झग्यासारखी. आणि नाचऱ्या पावलांनी खोलीत येते.
 ...मिनीचं सामान तिच्या बॅगमध्ये मावत नाहीये. सासरी जाणाऱ्या पोरीची ट्रंक आई भरून देते तशी मिसेस् रॉय मिनीचं सामान भरतेय. मिसेस रॉयच्या गळ्यात हात टाकत मीरा सांगते,
 'रॉय तुला यायला हवं हं उद्या माझ्याबरोबर! माझी खरेदी तुझ्याच चॉईसने करणार आहे मी. मला तुझी कायमची आठवण राहील म्हणजे.

६८ /स्वरांत