पान:स्वरांत.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "तिला शिक्षण दिलंय. तिने विशी ओलांडलीय. जीवनाबाबत बरं वाईट तिला कळायला हवं. पुढे काही अडचणी निर्माण झाल्या तर, त्याचे उत्तरदायित्व तिच्यावर आहे. त्या अडचणी तिने निभवायला हव्यात. आम्ही आहोतच. पण असं काही घडणार नाही असा मला विश्वास आहे."
 आई-पपांनी दिलेला हा विश्वासाचा सूर पुढे डॉक्टरांनी पण जपला. माझ्या वेड्यावाकुडया शब्दांचे पहिले वाचक तेच राहिले आहेत. त्यांची तक्रार असते की मी खूप कमी लिहिते. पण लिहू म्हटल्याने का कुठे लिहिता येते ? आणि लिहायचं नाही म्हटल्याने का कुठे स्वतःला रोकता येते ?
 गेल्या ८/९ वर्षात लिहिलेल्या, पहिल्यावहिल्या नऊ कथांचा संग्रह आज इंद्रायणीत अर्पण करतेय. (या कथा स्त्री, माहेर, मेनका, मराठवाडा यातून प्रकाशित झाल्या आहेत.) या कथासंग्रहात तरण्याचे सामर्थ्य असेल तर तो तरेल. अन्यथा बुडून जाईल. नव्हे, त्याने बुडायलाच हवे. खऱ्या कला असतील तरच इवलासा कोवळा जीव जन्माला येतो. खोटया कळा खोट्याच असतात. उदरात लपलेल्या जीवाला मोकळा श्वास देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नसते. अळेबळे जन्माला घातलेला अनुभव अल्पायुषीच ठरणार.
 तरीही मी समाधान मानीन. कारण या फसव्या कळांतूनच, खऱ्या; जन्मोत्सवी कळांच्या लाटा जन्माला येतात. ते सामर्थ्यही कधीनाकधी लाभेल !!!
 संसार, नोकरी, वाकीच्या उठाठेवी यात बुडालेल्या या भाबीच्या कथा एरवी इकडेतिकडेच लोळल्या असत्या. जर महावीर जोंधळेसारखा दीर लाभला नसता तर ! कथा, मागेलागून नेण्यापासून ते त्यांना देखणं रूप देईपर्यन्तचे सारे संस्कार त्यानेच केले आहेत. साथ मिळाली श्री. बाबा भांड यांची. प्रकाशनार्थ अनुदान मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपडही या दोघांनीच केली. त्यांच्या सहयोगामुळेच 'स्वरान्त' ला रूप लाभले आहे. पण आभार कशी मानू ? सारीच आपली.
 'स्वरान्त' च्या निमित्तानं जे जे मनात आलं, त्याला मोकळी वाट करून देतेय. इतकंच.

- शैला लोहिया