पान:स्वरांत.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनोगत
..........इतकंच!

 खूप खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. मी छोटी होते तेव्हाची. दरवर्षी उन्हाळ्यात नाहीतर दिवाळीच्या सुटीत आम्ही पार्ल्याला जात असू. मामाकडे. चांदवडचा चढ असो, नाहीतर कसाऱ्याचा हिरव्यागर्द झाडांनी वेढलेला वळणदार घाट असो. माझे डोळे खिडकीच्या बाहेर गढलेले असत. मला वाटे, हे आकाश . , हे दगड..., हा डोंगर... हे झाडं ही पिवळी फुलं... मला पुन्हा कधीच भेटणार नाहीत. मनांत आंत कुठे तरी व्याकुळतेची लहर दाटून येई. डोळे अधाशासारखे सारं गिळून घ्यायला धडपडत. मग दारची सारी म्हणत, 'खुळं आहे' झालं. या खुळेपणाचं कौतुक केलं माझ्या मामांनी. वक्तृत्वस्पर्धेत मिळालेलं बक्षिस असो; नाहीतर महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झालेला चिमुकला लेख असो. किंवा थरथरत्या आवाजात गायलेली एखादी कविता असो. कौतुकाचा हळुवार शिडकावा केला मामांनी नाहीतर आईंनी. त्यामुळेच खुळेपणाला शब्दांचे कोंभ फुटले. पार्ल्याच्या बंगल्यात रहाणाऱ्या गानूंची मी भाची नसते तर, जीवनाचा ओघ दहादिशांनी अंगभर झेलावा; त्याचे गार...उष्ण...कडवट स्पर्श अंतरात गोंदवून घ्यावेत, हे कळले असते की नाही कुणास ठाऊक !
 "तू मुलगी आहेस. म्हणून हे करू नकोस. इथे जाऊ नकोस." असा संस्कार आई-पपांनी दिलाच नाही. पण केलेल्या कृतीच उत्तरदायित्व स्वीकारावच लागवं याची कठोर जाणीवही दिली. आम्ही विवाह करायचं ठरवलं. तर, डॉक्टरना पहायची उत्सुकता पपांनी दाखविली नाही. लग्नाच्या दिवशीच सासरे-जावयाची गाठ पडली. त्यांच्या मित्रांनी आदल्या दिवशी विचारलं होतं.
 'शंकरराव, तुम्ही अजून जावयाला पाहिलं नाही. मुलगी आंतर-जातीय लग्न करतेय. पुढे काही बखेडा झाला तर?...'
 पपांनी नेहमीप्रमाणे ओठात हसत उत्तर दिलं-