पान:स्वरांत.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऑरेंज ज्यूस घेऊन कट्टयावर येऊन बसतो. आरामात ज्यूस पीत.
 ऑरेंज ज्यूस ... मग पाईनॲपल ... मग हापूस - स्पेशल. नंतर मिक्स ...
 घड्याळात नऊ वाजलेत. म्हणजे घरी नक्की रेडचा गोंधळ सुरू असणार. भेदरलेली ममी. पपांचा लाजिरवाणा चेहरा. आपल्याच पोरानं सारं सांगितलं हे कळल्यावर आतून पेटलेले. पण वरवर मिळमिळीत, गिळगिळीत चेहऱ्याने बसलेले पपा....
 कुजकट हसणारे शेजारी. बंगलेवाल्या बाया नि आतून धास्तावलेले पण स्वतःच्या सचोटीच्या स्टोऱ्या पोराबाळांना ऐकवणारे त्यांचे नवरे ...
 त्याला वाटतं, विजाला नाहीतर गिरिधरला बरोबर घेऊनच घरी जावं. तो ऑफिसच्या दिशेनं वळतोही. पुन्हा वाटतं, उद्या पेपरमध्येच वाचू दे.
 'बापाविरुद्ध जाण्याची आहे यांच्यात धमक ? ' विजाचे शब्द आठवतात. तो मनाशीच खुशीत हसतो नि घराकडे वळतो.
 सगळीकडे सामसूम.
 बहुधा सगळं पार पडलेलं दिसतंय.
 तो फाटक उघडतो. समोरून एक माणूस नि डॅडी हसत पायऱ्या उतरत बाहेर येतात. बरोबर ममीही.
 'हे आले आमचे चिरंजीव.'

सांगण्यासारखं काहीच उरलं नाहीये / ४५