पान:स्वरांत.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तुझे हिसकाटून घेतलेले क्षण तुला द्यायचे होते. मला हवं असलेल निगूढ गीत देण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यात होतं.
 फक्त तू हवी होतीस मला. तुझ्या माझ्यावर असलेल्या विश्वासासकट. निष्ठेसकट.
 शिरीषाबरचा पोपटी बहार फक्त चार दिवसांचा असतो.
 झुलत्या झिळमिळयांतून मोकळे होणारे गंध उत्तर रात्री वाऱ्यावरून दूऽऽर दूऽऽर पसरतात.
 त्या गंधांनं अवघं मन भरून जातं.
 मग त्या गंधांच्या स्मतींनी ग्रीष्मालाही ओलावा येतो.
 वर्षभर मी जगायचो, मे महिन्याची वाट पाहात. इथून परतताना तृप्तीत असायची निरंतरची अतृप्तता.
 आणि अतृप्ततेत तृप्तीची अथांग जाणीव ... पण आज लक्षात येतंय.
 तृप्तीसाठी धावणारा मी, नकळत तुझ्यातल्या 'स्त्री'ला जागवतोय याचं भानच उरलं नाही.
 या प्रश्नानं तू ते भान दिलसं.
 या क्षणी वाटतंय या पूर्वीच तू हा प्रश्न विचारला असता तर ...?
 होय फार उशीर झालाय.
 मला हवी असलेली सुरक्षितता देण्याचं बळ तुझ्या या जगात नाही आणि त्याही जगात नाही.
 हा प्रश्न विचारायलाच नको होता.
 तुझ्या तृप्तीचं सुख नासवून टाकायचं नव्हतं मला.

शेष प्रश्न / २५