पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। सूर्यनमस्कार धार्मिक अधिष्ठान सूर्योपासना अनादि कालापासून सुरू आहे. आदिमानवाचे प्रथम चिंतन नितांत रमणीय सूर्योदय- सूर्यास्त असणार. सूर्यप्रभा व सूर्यछाया यांची मोहिनी आज आपल्याला आहे तशीच आदिमानवांना त्या काळात असणार. सूर्यप्रकाशाची प्रखरता, त्याचे वडवानल रूप याचाही त्याला अनुभव आला असणार. यातून प्रथम उपास्य देवता म्हणून सूर्याला वंदन, त्याचे नित्य पूजन आणि यातूनच पुढे सूर्योपासना सुरू झाली असणार. रुद्रस्वरूप सूर्यदेवतेने आमच्या पाप-शत्रुंचा विनाश करावा. शांत स्वरूप सूर्यदेवतेने आम्हाला सुखशांती प्रदान करावी यासाठी सूर्यनारायणाची सकाळ-दुपार-सायंकाळ उपासना सुरू झाली असणार. ही सूर्योपासना अनादि कालापासून सुरू आहे. पाषाण युगातील नभोवंदन शिल्प याची साक्ष देतात. या शिल्पाकृतीमध्ये सूर्याला उर्ध्वहस्तासन स्थितीमध्ये वंदन हा विषय रेखाटलेला आहे. आदिमानवास जमिनीतून फळे- कंदमुळे, जंगलातून शिकार, नदी-नाल्यातून पाणी मिळत होते. हे खाद्यान्न धरणीमातेची देणगी आहे. सर्वच प्रकारचे भू-खाद्य व भू-पेय जगण्यासाठी आवश्यक आहेत हे त्याच्या लक्षात आले. यातूनच भूवंदन करण्यास सुरुवात झाली. कालांतराने हा सर्व सूर्याचाच प्रताप आहे हे त्या निरीक्षण व अनुभवातून उमजले. नभोवंदन आणि भूवंदन करण्यास त्याने सुरुवात असणार. हळूहळू या वंदन क्रियेमध्ये सुधारणा होत गेल्या सहा शरीरस्थिती नभोवंदनाच्या, सहा शरीरस्थिती भूवंदनाच्या अशा बारा शरीरस्थिती असलेला आजचा सूर्यनमस्कार विकसित झाला असणार. सूर्यप्रकाश व सूर्यतेज यामुळे अखिल ब्रह्मांड व्यक्त स्वरुपात येते. सूर्यप्रताप ज्याप्रमाणे सर्व विश्वामध्ये भरून उरलेला आहे त्याचप्रमाणे तो प्रत्येक अणू- रेणुमध्ये आहे. त्याची व्याप्ती गहन आहे. अगाध आहे. त्याचे धार्मिक अधिष्ठान अनुभवता येते. ते शब्दाने स्पष्ट करता येत नाही. अव्यक्ताची अनुभूती स्पष्ट करण्यासाठी काहीतरी स्थूल - व्यक्त स्वरूपाची आवश्यकता असते. स्थूल शरीराच्या माध्यमातून मला मिळालेला अनुभव शब्दरूपाने तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा माझा हा प्रयत्न. सूर्यनमस्कार एक साधना ०१