पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिणाम करणारे औषध मिळणार नाही.
 १०.०९ स्वतःपासून बदलाची सुरुवात करायची हा पहिला टप्पा.मनाचा तळ हा काळोखात असतो.तो खाली सोडून आपल्याला वर येणे आवश्यक आहे.हे जे अंतर्मन आहे ते पाश्चात्य विचाराप्रमाणे काळेकुट्टे आहे.ते शुद्ध आनंदाने व पवित्रतेने भरलेले आहे असा भारतीय विचार आहे.त्या अवस्थेला पोचेपर्यंत वाटेत खूप संकटे आहेत,अडथळे आहेत.विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत.वासना, लालसा यांच्या दऱ्याखोऱ्या पसरलेल्या आहेत,पण त्या टोकाला पूर्ण आनंद आहे.म्हणून स्वतःची ओळख हा पहिला टप्पा.
 १०.१० पुराणात एक गोष्ट आहे.हिरण्याक्ष नावाचा दैत्य मातला होता.तो कुणालाच आवरेना. सर्वजण त्रस्त झाले होते.त्याच्या दुष्टपणापासून वाचण्यासाठी,सर्व लोकांनी श्रीविष्णूचा धावा केला.विष्णू म्हणाले, मी या दैत्याचा समाचार घेतो.मृत्युलोकातल्या या दैत्याचे निदर्शालन करण्यासाठी त्यांनी वराहाचे रूप धारण केले आणि त्या दैत्याचा नाश केला.सर्व देव आनंदी झाले.पण मग पाहतात तो पृथ्वीवर आलेले विष्णू स्वर्गात परतलेच नाहीत.देव विचारात पडले.मग तपास करताना त्याना आढळले,की भगवान विष्णूंनी वराहरूप धारण केले,एवढेच नव्हे तर वराह म्हणून ते भूतलावर गटारात लोळत कुटुंबकबिला बाळगून बसले आहेत.त्यांना त्यांच्या विष्णुत्वाचाच विसर पडला आहे.पुन्हा देव चिंतेत पडले.त्यांनी भगवान शंकरांकडे धाव घेतली.भगवान शंकरानी वराहरूपातल्या विष्णूंना पाहिले,त्यांना स्वर्गात परत येण्याची विनंती केली,पण ते बधेनात.सर्व उपाय हरल्यानंतर त्यांनी बाणाने वराहरूपातल्या विष्णूंचा वध केला व त्याचे संपूर्ण शरीर छेदले.त्या कलेवरातले मूळ स्वरूपातले - विष्णुरूपातले-विष्णुभगवान स्वर्गलोकी रवाना झाले.कथेचा इत्यर्थ इतकाच की भारतीय कल्पनेप्रमाणे माणसाचे वरवरचे रूप हे त्याचे वराहरूप असते.ते सुखोपभोग,वासना,लालसा यांच्या गर्तेत लोळण्यात,प्रेयाच्या कैफात जीवन व्यतीत करण्यात आनंद मानते.त्याच माणसाच्या अंतरातले विष्णुरूप हे उच्च प्रतीचे असते.ते स्वयंप्रकाशी आहे.त्याची आठवण ठेवून,त्याला जागवत ठेवून,त्याला सतत श्रेयाची आठवण करून देत माणूस स्वतःचे व स्वतःबरोबरच्या लोकांचे उन्नयन करू शकतो.

 १०.११ व्यवस्थापकांत ही जाणीव निर्माण करणे व त्यासाठी क्रांतिकारक बदल घडवण्याची सुरुवात स्वतःपासून करणे ही भारतीयत्वाची खूण राहील.पाश्चात्य मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात मनोरुग्णांच्या अभ्यासापासून झाली आहे.त्यामुळे माणसाचे निरोगी रूप हा पाया न राहता मनाची रोगी स्थिती

५२ सुरवंटाचे फुलपाखरू