पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शक्तींचा परिपोष हे लोक करतात म्हणून तर त्यांना महा-जन असे म्हणतात.त्याशिवाय शेवटचे अनामिक बोट आहे.त्याला संस्कृतमध्ये अनामिकाच म्हणतात.खास असे त्याचे महत्त्व नसते.हे बोट बाकी चार बोटांना मदत करून त्यांची गुंफण करायचे काम साधते.लोक त्याच्यावर अंगठी चढवून त्याचा सन्मान करतात.विनोबांच्या मते शासनाचे,सरकारचे काम या बोटासारखे असते.स्वतःहून हे बोट काही करू शकत नाही.अनामिक असण्याचे कारण या शक्तीमध्ये किंवा बोटामध्ये स्वतःचे काम नसते.लोकशाहीत तर सरकार शून्यासारखे असते.त्याच्यामागे लोक उभे राहिले,लोकांचा एक या शून्याच्यामागे उभा राहिला की त्याची शक्ती दसपट होते.अन्यथा त्याचे महत्त्व शून्य,आजही,ज्या कामांमागे लोकांचा पाठिंबा नाही ती कामे शून्यवत् झालेली दिसतातच!
 १०.०२ व्यवस्थापनशास्त्रात या महाजनशक्तीचा विचार आपल्याला करायला हवा.समाजासमोरचा प्रश्न उपाशी मनांचा आहे.पाश्चात्य देशांच्या,विशेषतः इंग्रजांच्या संपर्कामुळे आम्ही इंग्रजी भाषा,इंग्रजी विचारपद्धत अशा इंग्रजी गोष्टी भारतात उचलल्या.पण सारे लोक ज्यामुळे जोडले जातात,त्यांच्या भावनांचा जिथे संबंध येतो ती धर्मकल्पना या साऱ्या इंग्रजीपासून वेगळीच राहिली.
 १०.०३ इंग्रजांच्या जीवनात ख्रिश्चन धर्मपंथाचे स्थान आहे,त्यांच्यावर ख्रिश्चन नैतिक शिक्षणाचे जे संस्कार आहेत ते आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या मनावर नाहीत.बायबलचा जो परिणाम तेथल्या लोकांच्या मनावर आहे तो भारतातल्या बहुसंख्य शिक्षित लोकांमधील व्यवस्थापक,अधिकारी किंवा कामगार लोकांच्या मनावर नाही.इंग्रजी शिकल्यामुळे इंग्रजी शब्द समजले,भाषा समजली पण त्यामागचा जो सांस्कृतिक संदर्भ आहे,तो आमच्यापर्यंत पोचलेला नाही.भारतातील घराघरात जे येथले संस्कार होते, धार्मिक संस्कार होते,ते प्रतिगामी,वेडगळ,अंधश्रद्धेचे प्रतीक म्हणून इंग्रजीत शिकलेल्यांनी टाकून दिले. धर्म हा खासगी प्रश्न आहे,समाजजीवनात त्याची लुडबूड असू नये हाच विचार आपल्याकडे शिष्टमान्य आहे. सामाजिक जीवनातून त्याला हद्दपार करण्याचा पुरस्कार केला गेला आहे.

 १०.०५ इंग्रजीतून शिकलेल्यांना इंग्रजीतल्या 'ऑर्गनाइज्ड रिलिजन' या मर्यादित अर्थाने धर्माची लुडबूड नको असे म्हणायचे असते.आपल्याकडे धर्म ही व्यापक व जीवनव्यापी कल्पना आहे.तिचा अर्थ इथल्या समाजाचे मूल्यसंचित असा आहे.त्या अर्थाने धर्माला बाजूला ठेवून वा वगळून आपण सामाजिक

५० सुरवंटाचे फुलपाखरू