पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बदल ठरू शकतो. आपण चौकट बदलताना काही मानसिक रेषा आखत असतो. 'आतले' काय, 'बाहेरचे काय हे ठरवत असतो. ठेवायचे काय, जी वगळायचे काय याची निवड करत असतो. हे ठरवताना आपल्या मनाची चौकटीत काय घ्यायचे; भावना किंवा भूमिका असते ती आणि काय गाळायचे ते ठरवते. एकूण दृश्यातून तुम्ही जेव्हा निवड करता तेव्हा तुम्ही तुमची टिकाटिप्पणी त्यात मिसळत असता. प्रकाशचित्रकाराची किंवा चित्रकाराची महत्ता किंवा वेगळेपणा ती निवड करण्यात असते.
 ३.०८ साध्या चित्रातल्यासारख्या भौतिक वस्तूंची कल्पना रेखाटताना जरा कोन बदलून, चौकट बदलून वेगळे परिणाम निर्माण करणे शक्य असते, तर सत्य' काय, 'मी' कोण, जग म्हणजे काय, समाजाशी माझा संबंध कसा- काय-केवढा? या साऱ्यांना जोडणारे सूत्र काय? ते कोणते? असल्या मूलभूत संकल्पनांच्या बाबतीत चौकट बदलून किती बदल घडवता येतील याची कल्पनाच केलेली बरी ! पण प्रथम त्यांची व्यवस्थापनाच्या क्षेत्रात गरज आहे हे स्वीकारायला हवे.
 ३.०९ भारतीय विचारांत पाश्चात्य अर्थाने फिलॉसॉफी याला 'दर्शन' हा शब्द वापरतात. इंग्लिशमध्ये याला 'वर्ल्डव्ह्यू' हा शब्द वापरला जातो. या शब्दातला भावार्थ महत्त्वाचा आहे. आपले तत्त्वज्ञान ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति।' या सूत्रावर आधारलेले आहे. सत् म्हणजे सार्वकालिक सत्य इंग्लिशमध्ये त्याला 'सुप्रीम रिअॅलिटी' म्हणतात. भारतीय विचाराप्रमाणे सत्य एकच आहे, फक्त जाणते (विप्र) त्याला नाना नावांनी (बहु-धा) संबोधतात. जाणत्यांना सत्याची घडणारी दर्शने किंवा भावलेली रूपे यांनाच 'दर्शने' असे म्हणतात. एकाच सत्याला अनेक प्रकारांनी पाहता येते हा बहुविधतेचा मुद्दा कळीचा आहे.
 ३.१० आपल्याकडे मुख्य दर्शने सहा मानलेली आहेत. त्याशिवाय अन्य अनेक दर्शने आहेत. त्यांत नवीन दर्शनांची भर पडू शकते. दर्शनांची संख्या मर्यादित मानलेली नाही. नवे मनू येत राहणार, नवी दर्शने घेत राहणार, ते ती तशी मांडत रहाणार. म्हणजे हा एक नित्यनूतन राहणारा, बदलणारा आणि तरीही गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सातत्य असणारा सनातन प्रवाह आहे. भारतीय विचारपद्धतीची ही खास खूण आहे. एखाद्या विशिष्ट ग्रंथावर किंवा पुस्तकावर आधारलेल्या किताबी पंथात 'एकम् सत्' हे मान्य केलेले असले तरी 'बहु-धा वदन्ति' हे मान्य नसते.

 ३.११ पाश्चात्य म्हणजे मुख्यतः ख्रिश्चन विचारात परमेश्वर व भक्त हे द्वैत

सुरवंटाचे फुलपाखरू १५