Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. प्रकारच्या देखाव्यांचीं वगैरे चित्रे टांगलेलीं होतीं. हा बंगला वामनरावांच्या वडिलांनी बांधलेला असून बंगल्याला हें पाश्चात्य पद्धतीचें स्वरूप वामन रावांनी आणले होतें. दरवाजांतून आंत पाऊल टाकल्याबरोबर मुख्य दिवाणखान्यांत प्रवेश होई. याच दिवाणखान्यांत वामनराव आपल्या स्नेह्यां- सोबत्यांसह बोलत बसत व सकाळचा चहाहि ते याच दिवाणखान्यांत घेत. या दिवाणखान्याच्या डाव्या बाजूला एकसारख्या चार खोल्या होत्या. पहिल्या खोलींत वामनरावांची लायब्ररी असून त्याच खोलींत ते लिहिण्या- वाचण्यास बसत. शेजारची खोली मुलांना अभ्यासासाठी दिलेली असून याच खोलींत बसून दिनकर मुलांना शिकवीत असे. पलीकडच्या खोलींत मालती अभ्यास वगैरे करीत असे व त्याच्या पलीकडच्या खोलींत घर- धनीणबाईंचा मुक्काम असे. उजव्या बाजूला एकच मोठी खोली असून ती दिवाणखान्याप्रमाणेच सजविलेली होती. या खोलीत एक बाजाची पेटी व एक पियानो नांवाचे वाग्रहि होतें. ही दोन्ही वाद्ये वाजविण्यांत मालती बरीच तरबेज झाली होती. वरच्या मजल्यावरहि इतक्याच खोल्या होत्या. आणि तेथील एकंदर सामानावरून कुटुंबांतली मंडळी रात्रीची तेथें निजत असावी हे कोणाच्याहि लक्षांत येई. दिनकरची जेव्हां वामनरावांकडे वर्णी लागली, तेव्हां वामनरावांचें वय सुमारें पंचेचाळीस वर्षांचे होतें. ते दिसण्यांत रुबाबदार असून बोलण्यांत फार मिठास होते. शरीर बांध्याने उंच असून मजबूत होते. त्यांचे वडील करमठ होतें; पण वामनरावांची वागणूक पूर्ण सुधारक पद्धतीची होती. त्यांचे वडील मोठे अम्मलदार होते व त्यांनीं वामनरावांना स्वतःचें घर वगैरे बरीच संपत्ति ठेवली होती. स्वतः वामनराव इंजिनियर असून दर महा तीनशे रुपयांची प्राप्ति त्यांना होत असे. त्यांचा प्रथम विवाह त्यांच्या वडिलांनीच केला होता आणि त्या स्त्रीपासून त्यांना एक मुलगीहि झाली. वर सांगितलेली मालती हीच त्यांच्या प्रथमपत्नीची मुलगी होय. प्रथम पत्नी वारल्यावर त्यांनी एका विधवेशी पुनर्विवाह केला. या पुनर्विवाहित स्त्रीपासून त्यांना मदन व वसंत हीं दोन मुले झाली होती. वामनराव स्वभावतःच दिलदार वृत्तीचे असून ते फार बहुभुत होते.