पान:सिंचननोंदी.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्माण झाला की, मग स्वयंचलित आडवे नियामक वापरून खालून नियंत्रण (डाऊन स्ट्रीम कंट्रोल) तंत्राने कालवे चालवता येतात.
 शेतकन्यांना किंवा कनिष्ठ सिंचन अधिकाऱ्यांना जास्त स्वातंत्र्य देणान्या या 'खालून नियंत्रण' तंत्राच्या तपशिलाबद्दल आपण आता चर्चा करू.
 'खालून नियंत्रण तंत्रात प्रथम कालवे लेव्हल टॉप पद्धतीने बांधले जातात. ठराविक अंतरावर विशिष्ट निकषांच्या आधारे स्वयंचलित आडवे नियामक बसवण्यात येतात.
 कालव्यावर कोठेही पाणी घ्यायला सुरुवात करायच्या अगोदर कालवा पाण्याने पूर्ण भरलेला असतो. आता आडवे नियामक बंद अवस्थेत असल्यामुळे कालव्यात विविध भागांत दोन आडच्या नियामकांच्या मध्ये छोटे छोटे तलाव निर्माण होतात. आकृती क्र. २ मध्ये दाखविल्याप्रमाणे या तलावात साठवलेल्या पाण्याची पातळी साहजिकच 'ब' स्थितीत असते.
 कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक अथवा पाणीवाटप कार्यक्रम न करता कालव्यावरील कोणत्याही वितरिका, मायनर किंवा विमोचकातून आता संबंधित कनिष्ठ अधिकारी अथवा शेतकरी सरळ पाणी घ्यायलाच सुरूवात करतात.
 त्यांनी पाणी घेतल्यामुळे तेवढ्या प्रमाणात पाण्याची पातळी 'इ' पेक्षा (आकृती क्र. ३) खाली जाते. साहजिकच पाण्यावर तरंगणारा आडव्या नियामकाचा फ्लोट खाली जातो. त्यामुळे आडवा नियामक जरूर तेवढाच आपोआप उघडला जातो. कालव्याच्या वरच्या भागातून पाणी खाली यायला लागते. हाच प्रकार खालून वर या क्रमाने हळूहळू कालव्यावर सर्वत्र होत शेवटी धरणाचे दारही जरूर तेवढेच आपोआप उघडले. कालव्यातून जेवढे पाणी बाहेर पडले बरोबर तेवढेच पाणी धरणातून कालव्यात येते. आता कालव्यात सर्वत्र पाण्याची पातळी 'क स्थितीत असते. (आकृती क्र. २)
 सिंचन संपले किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे (पाऊस पडला. रात्री पाणी नकोय) पाणी घेणे थांबवायचे असेल (किंवा कमी पाणी घ्यायचे असेल) तर पुन्हा कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित अधिकारी अथवा शेतकरी आपापले विमोचक, मायनर किंवा वितरिका कमी जास्त प्रमाणात बंद करू शकतात. त्यांनी पाणी घ्यायचे थांबवताच पाण्याची पातळी परत 'इ' पेक्षा वर चढायला लागते (आकृती क्र. ३) फ्लोट वर उचलला जातो. आडवा नियामक जरूर तेवढा बंद होतो. कालवा बंद होण्याचा (अथवा त्यातील प्रवाह कमी होण्याचा हा प्रकार परत खालून वर या क्रमाने कालव्यावर सर्वत्र होत शेवटी धरणाचे दार आपोआप आवश्यक तेवढे बंद होते. संपूर्ण कालवा परत पूर्व परिस्थितीत म्हणजे भरलेल्या अवस्थेत येतो. पुन्हा एकदा कालव्यात सर्वत्र पाण्याची पातळी 'ब' स्थितीत येते (आकृती क्र. २)
 पूर्वसूचना न देता खालून केले गेलेले प्रवाहातील बदल (पाणी घेणे, कमी जास्त घेणे. बंद करणे वगैरे) काही विशिष्ट काळापुरते 'कालवा साठा' शोषून घेतो, म्हणून- कालवा साठ्याचे महत्त्व. असा कालवा साठा 'वरून नियंत्रण तंत्रात नसतो म्हणून तेथें सर्व संबंधितांवर अनेक बंधने असतात.

विकेंद्रीकरणाचे तंत्र

 'खालून नियंत्रण' तंत्र हे अनेक प्रकारे खऱ्याखुऱ्या प्रगत लोकशाहीला साजेसे तंत्र आहे. निर्णयप्रक्रियेचे विकेंद्रीकरण या तंत्रातं अभिप्रेत आहे. शेतकऱ्यांना आणि कनिष्ठ सिंचन अधिकाऱ्यांना निर्णयप्रक्रियेत मानाचे स्थान व स्वातंत्र्य या तंत्रामुळे मिळते. या स्वातंत्र्याचा जबाबदारीने उपयोग झाला तर ठरलेल्या ठिकाणी कबूल केलेले पाणी योग्य वेळी उपलब्ध करून देण्याची हमी सिंचन अधिकारी खरोखरच तांत्रिकदृष्ट्या

३४.