पान:सिंचननोंदी.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंचननोंदी - ५

नियंत्रणशून्य पाणी वापर

 पाण्याच्या अंदाजपत्रकापासून सुरुवात करून पाणीवाटप कार्यक्रमापर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे आपण आजपर्यंत सिंचननोंदीत चर्चिले. पाणीवहन ( वितरिका, 'मायनर चाऱ्या) व नियंत्रण व्यवस्था (आडवे नियामक, चाऱ्यांची दारे) किमान सुस्थितीतसुद्धा नसणे आणि जलगतिशास्त्राच्या (Hydraulics) सुयोग्य वापराचा अभाव याबद्दल आपण मागच्या सिंचननोंदीत काही मुद्दे नोंदवले.
 हे सर्व मुद्दे काही तरी नवीन आहेत किंवा प्रथमच चर्चिले जात आहेत अशातला भाग अजीबात नाही. गेल्या दहा-पंधरा वर्षांत सिंचनाबद्दल भारतात मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला आहे. बहुमोल साहित्य, विशेषतः इंग्रजीत, उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील सिंचनाबद्दल औरंगाबादच्या 'वाल्मी' संस्थेने (जल व भूमी व्यवस्थापन संस्था) गेल्या १२ वर्षांत अनेक प्रकाशने प्रकाशित केलेली आहेत. संस्थेकडे सिंचन प्रकल्पांच्या ...मूल्यमापनाचे अनेक अप्रकाशित अहवालही आहेत. महाराष्ट्रातल्या विविध भागांतील अनेक लघु, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पात नक्की काय अवस्था आहे व ती तशीच का आहे याचे शास्त्रीय विश्लेषण अगदी मायनर व विमोचकाच्या तपशिलासकट आज वाल्मीत उपलब्ध आहे. वाल्मी ही पाटबंधारे खात्याचीच एक संस्था असल्यामुळे वाल्मीची प्रकाशने व अभ्यास पाटबंधारे खात्यातील सर्वांना सदैव उपलब्ध आहेत. परंतु निर्माण झालेली क्षमता आणि त्याचा प्रत्यक्ष वापर यात सिंचनाच्या बाबतीत जशी आणि जेवढी तफावत आहे तशी आणि तेवढी किंबहुना जास्तच तफावत सिंचनाबद्दलच्या साहित्याबाबतही आहे. असो.
 तर अशा प्रत्यक्ष अभ्यासाच्या आधारे तयार झालेल्या साहित्यात पाणी वापराबद्दल काय वाचायला मिळते हे आपण आज पाहुयात.
 पाण्याचे अंदाजपत्रक, पाणी अर्ज मंजुरी, मागणीपत्रके व सर्व पातळ्यांवर पाणीवाटप कार्यक्रम ही लंबीचवडी प्रक्रिया पूर्ण झाली की मग प्रत्यक्ष सिंचनाला सुरुवात होते. ही सर्व प्रक्रिया व्यवस्थितरीत्या शास्त्रीय निकषांच्या आधारे आधुनिक व्यवस्थापन शास्त्राला अनुसरून कशी होत नाही हे आपण यापूर्वी पाहिलेच. प्रत्यक्ष कालवे सुरू असताना पाणी वापर कसा होतो हे पाहणे तर अक्षरशः उद्वेगजनक आहे. महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रकल्पाच्या एका सिंचन उपविभागात एका विशिष्ट रोटेशनमध्ये पाणी वापर कसा अपेक्षित होता आणि प्रत्यक्षात तो कसा झाला याची अत्यंत बोलकी आकडेवारी वाल्मीच्या प्रकाशन क्रमांक २० मध्ये पृष्ठक्रमांक ४० वर दिलेली आहे. ती येथे तक्त्यात उधृत केली आहे.
 काय सांगते ही आकडेवारी ? पूर्णतः नियंत्रणशून्य पाणीवाटप व वापर हाच या आकडेवारीचा सरळसरळ अर्थ नाही का ?
 तक्त्यात (जागेअभावी) उपविभागाच्या पातळीवरील माहितीच फक्त दिलेली आहे. प्रत्येक शाखा, बीटमधील अशाच माहितीचा खोलात जाऊन अभ्यास केला तर त्या · रोटेशनमध्ये चक्क अनागोंदी झाली असाच निष्कर्ष काढावा लागतो. विमोचक किंवा नरसुद्धा कधीही सुरू करणे. मध्येच बंद करणे व परत सुरू करणे वगैरे वगैरे प्रकार सर्रास झालेले दिसतात.

२४