पान:सिंचननोंदी.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंचननोंदी - १

धरणे तर झाली.....

 रणातील पाणीउपलब्धतेचे अंदाज आज चुकीचे ठरताहेत. अनेक कारणांच्या एकत्रित परिणामांमुळे पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांमध्ये 'फक्त सिंचनासाठी 'पाण्याची उपलब्धता' दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्यामुळे "सिंचनक्षमतेचा पूर्ण वापर" एवढेच नव्हे तर मुळात प्रकल्पांची संकल्पित सिंचनक्षमता टिकवून कशी ठेवायची हाच प्रश्न येत्या दशकात गंभीर स्वरूप धारण करणार आहे.
 असे का होते आहे ? याचे सिंचनावर काय परिणाम होतील ? सिंचन तंत्रज्ञानात कोणते लक्षणीय बदल करण्याची नितांत गरज आहे ? अशा स्वरूपांच्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न या लेखात केला आहे.

धरणे मातीने भरली !

 पाणलोट क्षेत्रातून दरवर्षी किती माती वाहून धरणात येईल याबद्दल काही अंदाज धरणे बांधताना केले जातात. दुर्दैवाने हे अंदाज आज चुकीचे ठरलेले आढळून येत आहेत. अंदाजापेक्षा अनेक पटीत जास्त वेगाने धरणे मातीने भरली जात आहेत. साहजिकच अपेक्षेपेक्षा बरेच कमी पाणी धरणात साठवले जात आहे. पाणलोट क्षेत्राच्या विकासाकडे सातत्याने झालेले दुर्लक्ष हे धरणे पाण्याऐवजी मातीने भरण्यामागील एक प्रमुख कारण आहे हे नव्याने सांगण्याची गरज राहिलेली नाही.'
 दरवर्षी किती माती धरणात येईल याबद्दलचे वास्तवदर्शी (सुधारित) अंदाज लक्षात घेऊन धरणे बांधावीत अथवा आहेत त्या धरणात सुधारणा करावी असे केवळ · अभियांत्रिकी उपाय सुचवण्याऐवजी मुळातच माती आहे तेथेच थोपवण्याचे प्रयत्न ताबडतोबीने सर्वदूर व्हायला हवेत.

बिगर शेती गरजांसाठी जास्त पाणी

 पिण्याच्या पाण्यासाठी, औद्योगीकरणासाठी व तत्सम बिगर शेती गरजांसाठी किती पाणी (निदान) नजीकच्या भविष्यात द्यावे लागेल याचा पुरेसा वस्तुनिष्ठ विचार धरणातील पाण्याचा साठा ठरवताना होतोच असे नाही. बिगरशेती गरजांसाठी पाण्याची मागणी झपाट्याने वाढते. ती पूर्णही करावी लागते. तेवढ्या प्रमाणात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होते. लोकसंख्येतील वाढ व ग्रामीण भागाचे शहरीकरण यामुळे बिगरशेती गरजांसाठी पाण्याची मागणी सतत वाढतच राहणार आहे. अशा गरजांसाठी स्वतंत्र व्यवस्था होऊ न शकल्यास पूर्ण झालेल्या सिंचनप्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता उत्तरोत्तर कमीच होत जाणार आहे.

पाणलोट क्षेत्रात नवीन प्रकल्प

 'धरण बांधताना पाणीनियोजनात विचारात न घेतलेल्या योजनांना (उदा. पाझर तलाव, लघु व मध्यम सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना, पाणीपुरवठा योजना वगैरे) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने मंजुऱ्या दिल्याने आणि तसे प्रकल्प प्रत्यक्षात उभे राहिल्यामुळे पाणी ठिकठिकाणी अडवले जाते. वापरले जाते. साहजिकच मूळ पाणी "नियोजन फक्त कागदावरच राहते. अपेक्षेपेक्षा कमी पाणी घरणात येते:
 पाणलोट क्षेत्रात पाणी वापराच्या विविध योजना अंमलात येणे अपरिहार्यच होते व आहे. प्रश्न त्यांना मंजुरी नाकारण्याचा किंवा विरोध करण्याचा नसून दूरगामी