पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिकतर प्राचीन लेखन पक्षपातीच म्हणायला हवे. पूर्वी जात, धर्म यांना टोक होते. परधर्मीय परजातीय सहिष्णुतेचा विचार आदर्श असला, तरी समाज व्यवहार बंदिस्त होते. यातून एक बंदिस्त मानसिकता उदयाला आली होती. दुर्दैवाची गोष्ट अशी की, इतक्या वर्षांच्या अनुभव, शिक्षणातून त्यात फारसा फरक पडलेला नाही. डॉक्टर ताराचंद आणि हमायू कबीर यांनी हिंदुत्वावरील इस्लाम परिणामाविषयी लिहिले आहे. एक तर ते अतिशयोक्त आहे आणि विपर्यस्तही! इतिहासकारावर एक सामाजिक समन्वयाची जबाबदारी असते, ती इथे अभावाने दिसते. त्या तुलनेने पाहायचे झाले तर प्राचीन कवी अमीर खुसरो, कबीरदास अधिक जबाबदारीने लिहीत होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. जायसी, कुतुबन, मंझन, मुसलमान कवी होते. पण त्यांच्या लेखनाची बैठक उदार होती. खुसरो, कबीरांनी वापरलेली भाषा, लिपी सर्वांना घेऊ जाणारी होती. आशय अधिक उदार होता, हे वेगळे सांगायची गरज नाही. दिनकर जेव्हा हे सारं विवेचन करतात, तेव्हा त्यांना पण पूर्वसुरींचे हे भान होतं, ते लक्षात येते. याची कारणमीमांसा करताना दिनकर हे स्पष्ट करतात की या सर्वांवर औरंगजेबापेक्षा उदारवादी लेखकांवर अकबराचा प्रभाव अधिक होता. सन १९४७ ला भारत-पाकिस्तानचे विभाजन ज्या फुटीर वृत्तीमुळे झाले, त्याची बीजे आपणास शेख अहमद सरहिंदींच्या लेखनात आढळतात. औरंगजेबाच्या कृतिकार्यक्रमाचा पाया (धार्मिक अत्याचार, जिझिया, धर्मातर इ.) शेख अहमद सरहिंदींचे विचार होते, हे दिनकरांचे मूल्यमापन व आकलन पुढील काळाच्या संदर्भात वृत्तीद्वारेच आढळून येते हा अभ्यास वाचताना दिनकरांची ऐक्याविषयीची आस्था अधिक प्रखर होते. हा अध्याय दिनकर विशेष तळमळीने लिहितात, हे लक्षात आल्यावाचून राहात नाही.

 सदर अध्याय दिनकरांनी विस्ताराने लिहिलाय त्यावर त्यांनी सुमारे १५0 पाने खर्ची घातली आहेत. इस्लामच्या पहिल्या भारत संपर्कापासून ते स्वातंत्र्यपर्यंतच्या हिंदू-मुस्लीम संबंध, संघर्ष, संबंध, परस्पर आदान-प्रदान उभयपक्षी प्रभाव या सर्वांची चर्चा प्रस्तुत अध्यायांत आहे. विविध बारा प्रकरणांमधून दिनकर इस्लाम धर्म, कुराण, धर्माचरण, धर्मप्रसार यांची तर चर्चा करतात, पण भारतीय संदर्भात ते हिंदू, शीख धर्म आणि त्यांच्या इस्लामशी झालेल्या संघर्ष, संवेदना अनुशीलन करतात. भाषा, कला, साहित्य, खानपान, पोषाख, विचार, धर्मपद्धती या सांस्कृतिक अंगानी परस्पर झालेली देवघेव सांगायलाही दिनकर विसरत नाही. अशा मांडणीतून

साहित्य आणि संस्कृती/६८