पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



इतकी सारी ज्ञानविज्ञाने, धर्म- तत्त्वज्ञानं, इतिहास-भूगोल, अध्यात्म नि विज्ञान एकाच वेळी समतोलपणे कसा पेलू शकतो? शोध घेता लक्षात येतं की, दिनकर एक लेखक, कवी, विचारक, इतिहासकार म्हणून मुळात समन्वयवादी वृत्तीचे उपासक व समर्थक होत. त्यामुळेच त्यांना ते शक्य होतं.

 बौद्ध धर्माचा जगातील प्रभाव का कमी झाला याची साक्षेपी समीक्षा दिनकर यांनी संस्कृति के चार अध्याय' या ग्रंथात केली असून ती मांडणी विचार व विश्लेषणाद्वारे वाचकांना अपेक्षित तार्किक निकषाकडे नेण्याइतकी प्रभावी आहे. पाण्यात जसे शेवाळ निर्माण होते. तसे बौद्ध धर्मांतर्गत विसंगती निर्माण झाली. महायान व हीनयान, शैव आणि शाक्त अशा पंथभेदांमुळे बौद्ध धर्मही कर्मकांडी बनला. योग्य परिणती तंत्रमार्गात झाली. रुदन, गायन, विलाप इत्यादींद्वारे ईश्वरास प्रसन्न करण्याचे उपाय अस्तित्वात आले. तंत्र, मंत्र, चमत्कार, भस्म इ. ना साधनेत महत्त्व आले. बळी, संभोगसारखे अघोरी प्रकार हा साधनेचा व पापमुक्तीचा, संकटमोचनाचा मार्ग बनला. यातून हठयोग जन्माला येऊन पाण्यावरून चालणे, ईश्वराचा अंश बनणे असे अतर्क परंतु तत्कालीन अशिक्षित जनतेत भय, गंड निर्माण करणारे उपाय साधना बनली. कुंडलिनी जागृती, विपरीत मार्ग अवलंबन यातून बौद्ध धर्म मूळ उद्दिष्टांविरोधी कृतींनी ग्रासून गेला. गुह्य समाज निर्मितीच्या अट्टाहासाने मंत्रयान, सहजयान, हीनयान, कालचक्र यान, वज्रयान, तंत्रयान असे तुकडे होत होते. मूळ केव्हा लयाला गेला हे अनुयायांनाही कळाले नाही. दिनकरांनी हे सारे विश्लेषण बिनतोड युक्तिवादाद्वारे परिणामकारकपणे केले आहे. जसा विघटन प्रवास जैन धर्माचाही झाला. त्याचीही सविस्तर चर्चा या अध्यायाच्या शेवटच्या प्रकारणत दिनकरांनी केली आहे. जैन व बौद्ध धर्म अनुयायी वेद, ब्राह्मण, जातिप्रथा यांच्या त्राग्यातून हिंदू धर्मापासून दूर झाले होते. पुढे इस्लाम धर्माच्या आगमनामुळे त्यांना हिंदू, बौद्ध व जैन या तिन्ही धर्मापेक्षा इस्लाम धर्म सुबोध वाटला. परिणामी हिंदू मतावलंबी मोठा समाज धर्मांतराचा बळी ठरून इस्लामी झाला. दिनकरांनी या अध्यायात हिंदू पाया असलेल्या धर्म विचारधारेच्या या विवेचनातून विसंगती अधोरेखित केली आहे.

 हिंदू-मुस्लीम संबंध खरेतर सर्वांगांनी समजून घ्यायचा विषय आहे. या दोन्ही धर्मावर त्या त्या वा अन्य धर्मीयांकडून विपुल लेखन झाले आहे.

साहित्य आणि संस्कृती/६७