पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओळख व्यक्ती म्हणून न राहता ती जात, धर्म, वर्ग या अनुषंगाने होते आहे. समाज नेतृत्व अनुकरणीय न राहणे वर्तमान सांस्कृतिक अरिष्ट होऊन बसले आहे. ग्रामीण संस्कृतीचे झपाट्याने होणारे नागरिकरण चिंतेचा प्रश्न असला, तरी संस्कृतीच्या सीमारेषांचे विलय करणारा प्रश्न म्हणूनही त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. गाव जिवंत राहिल्याशिवाय शहराने काय गमावले हे पुढच्या काळात समजणे अवघड होऊन बसेल. अल्पसंख्य समाजाचा प्रश्न तर आता ऐरणीवरचा. आता तर बहुसंख्याकांनाही आरक्षण हवे असल्याने एकावन्न विरुद्ध एकोणपन्नास टक्के समाज असा नवा विग्रह सोडविण्याचा यक्षप्रश्न आहे. (पृ. ४३५). यातले खरे वास्तव व्यक्तिविसर्जनाचं आहे, तिकडे जैनेंद्र चपखलपणे लक्ष वेधतात व तिथेच त्यांच्या विचारकाची ओळख पटते. नागरी भूमिकेवर सर्व समान, विशेषाधिकाराच्या प्रश्नाचे वैधानिक रूप व तेही अल्पसंख्य अंगाने (धर्म, जात, लिंग, भाषा इ.) या परस्पर छेद देणाच्या तत्त्वात समन्वय व सम्यकता हा आजचा सांस्कृतिक प्रश्न बनू पाहतो आहे. बहुसंख्य समाज उदारपणे अल्पसंख्याकांना समजून घेणार नाही, तोवर भारताचे सांस्कृतिक प्रश्न सुटणार नाहीत ही लेखकाची खूणगाठ त्याचे समाधान स्पष्ट करणारी आहे. सामाजिक प्रश्नांना स्पर्धात्मक रूप येणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक असल्याचे जैनेंद्र समजावतात. विभेदांचे रूपांतर सहअस्तित्वात होण्यातूनच भारतीय समाज एकजिनसी बनेल हेही जैनेंद्र जबाबदारीने समजावतात. राज्य, राष्ट्राच्या कल्पना मांडणे महत्त्वाचे ही लेखकाची बजावणी अंतर्मुख करणारी ठरते. धार्मिकता विरुद्ध धर्मनिरपेक्षता, व्यक्तिवाद विरुद्ध समाजवाद अशा टोकाच्या भूमिकांना अभिनिवेशी रूप देण्यात काहीच हाशिल होणार नाही, ही जाणीव वाचकांना विचार करायला भाग पाडते. या तीन अंगांच्या दुर्लक्षातून आपली सारी अनुशासनहीनता जन्मते. हे लक्षात आणून देत जैनेंद्र कृतिप्रवण प्रगल्भ समाजाचे स्वप्न पहातात.

साहित्य क्षेत्र

 ‘भारत' खंडातील शेवटचे प्रकरण साहित्य विषयाला समर्पित आहे. संपूर्ण जीवनभर जैनेंद्रांनी साहित्यास श्वास मानून तपश्चर्या केली. मूल्य व आदर्शाची पूजा व आचरण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून पुढे येते. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा जैनेंद्र साहित्य क्षेत्राबद्दल विचार करायला लागतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, पूर्वी जे साहित्य साधनेचे क्षेत्र होते, ते आज व्यवसाय बनले आहे. औद्योगिक क्रांतीने मनुष्य संबंधांऐवजी

साहित्य आणि संस्कृती/१६१