पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रास्ताविक दोन शब्द


 'साहित्यातील जीवनभाष्य' या विषयावर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने आयोजित केलेल्या 'गजेंद्रगडकर व्याख्यानमालेत माझी १२, १३, १४ मार्च १९६५ या दिवशी व्याख्याने झाली. ती व्याख्याने आता पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत आहेत. व्याख्याने लिहून काढताना प्रत्येक व्याख्यानाचा बराच विस्तार केला आहे. मूळच्या रूपात विषय ४०/५० पृष्ठात आटोपला असता. त्या विषयाचा आता तिपटीच्यावर विस्तार केलेला आहे.
 'जीवनभाष्य' म्हणजे काय ते स्पष्ट करून नंतर जगातील भिन्न भाषांतील अभिजात साहित्यातील उदाहरणांच्या साह्याने या विषयाच्या अंगोपांगांचे विस्तृत विवेचन या प्रबंधात केले आहे. जगातल्या सर्वच्या सर्व अभिजात ललितकृतीचा परामर्श घ्यावा असा मुळातच हेतू नव्हता व नाही. जीवनभाष्याविषयीचे माझे विचार विवरून सांगावे एवढाच हेतू आहे व त्याला अवश्य ती उदाहरणे तेवढी घेतलेली आहेत. संस्कृतिदर्शन, भिन्नवर्गांच्या जीवनावरील भाष्य, दलित जीवन, स्त्री जीवन यांचे दर्शन, मानवी मनांतील मूल्यांचा संघर्ष, मानवाच्या अंतरंगाचे दर्शन अशी प्रकरणे या प्रबंधात आहेत. याखेरीज आणखीही जीवनाच्या अनेक अंगावर साहित्यिकांनी भाष्य केलेले आहे. पण प्रबंधाची मर्यादा ध्यानी घेऊन त्याचे विवेचन येथे केलेले नाही. त्याचप्रमाणे जगाच्या अभिजात साहित्यातील आणखी अनेक ललितकृती जीवन भाष्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. पण त्यांचाही वरील कारणास्तवच प्रबंधात समावेश केलेला नाही. साहित्यातील जीवनभाष्याचे स्वरूप, त्याचे विविध प्रकार यांची सम्यक् कल्पना श्रोत्या वाचकांना आणून द्यावी एवढाच विनम्र उद्देश या प्रबंधाचा आहे. विषयाचे निःशेष विवेचन करावे हा हेतू नाही. हे ध्यानात घेतल्यास बरेचसे गैरसमज टळतील असे वाटते.
 मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या चालकांनी मला व्याख्याने देण्याची संधी दिली आणि आता ती व्याख्याने प्रबंधरूपाने ते प्रसिद्ध करीत आहेत याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

- पु. ग. सहस्रबुद्धे