पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राम सुमंत्राला निरोप देताना शोकाने म्हणतो, “शोकाने खचलेला म्हातारा, व स्त्रीमध्ये गुंतलेला असा राजा आहे, म्हणून मी सांगतो, ऐक" त्याचप्रमाणे वनवासात गेल्यावर पहिल्या की दुस-या दिवशी तो लक्ष्मणाला म्हणतो सा हि देवी महाराजं कैकेयी राज्यकारणात् । अपि न च्यावयेत् प्राणान् दृष्ट्वा भरतमागतम् ।। काम एवार्थधर्माभ्यां गरीयानिति मे मतिः । को ह्यविद्वानपि पुमान् प्रमदाया कृते त्यजेत् । छन्दानुवर्तिनं पुत्रं तातो मामिव लक्ष्मण ।। (२.४७.६,७,१०). "भरत आलेला पाहून कैकेयी राज्य संपादण्यासाठी राजाचा प्राण तर नाही ना घेणार? अर्थ व धर्म ह्यांपेक्षाही काम वरिष्ठ असे आता मला वाटायला लागले आहे. असा कोणी अडाणी तरी माणूस आहे का की, जो बाबांनी मला टाकले त्याप्रमाणे आपल्या आज्ञाधारक पुत्राला टाकील?" एवढेच नव्हे, तर राजासुद्धा कौसल्येच्या महालात आल्यावर स्वत:बद्दल जे उद्गार काढितो, ते असेच त्याचा दुर्बलपणा व शहाणपणाचा अभाव दाखवितात कैकेय्या विनियुक्तेन पापाभिजनभावया । मया न मन्त्रकुशलैर्वृध्दैः सह समर्थितम् ।। न सुहृद्भिर्न चामात्यैर्मन्त्रयित्वा न नैगमैः । मयायमर्थः संमोहात् स्त्रीहेतोः सहसा कृतः ।। (२.५.३१५,१६). “जी वाईट गोष्ट, तीच जणू काही चांगली असे कैकेयीने केले; व मीही जाणत्या, विचारी वृद्धांचे त्याबद्दल काय मत आहे, ते विचारिले नाही; मित्रांशी चर्चा केली नाही: मंत्र्यांना, शास्त्रविदांना निवाडा करण्यासाठी बोलाविले नाही; आणि भुलीने एका बाईसाठी तडकाफडकी गोष्ट करून टाकली." असा होता राजा. पण मुलगाही तडकाफडकी गोष्ट करणारा होता, असे म्हणावे का ? तो लहान होता, तो अधिकारी नव्हता. राजालाच ते करिता आले असते. सकाळी सभा बोलावून सर्वांसमक्ष रामाला अभिषेक करावयाचे ठरले होते. ते बोलणे राजाने मोडले कसे? राजा सत्यप्रतिज्ञ म्हणून नव्हे, तर स्त्रीलंपट आणि म्हातारा होता. || संस्कृती ।।