पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कामाचे निमित्त करून लज्जास्पद संवाद करणे, वरिष्ठांकडून प्रलोभनांचा पाऊस (पगारवाढ, पदोन्नती, पदनियुक्ती, बदली), कामावर सतत अनावश्यक लक्ष ठेवून चुका काढून छळत रहाणे (शरणागती साठी), हिडिस नकला करणारी चित्रे इ पाठवणे, पासवर्ड चोरून खासगी अकाऊंट्स (फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप इ.) मध्ये डोकावणे - हे सर्व प्रकार तिला रोज अंशतः मारत आहेत. (Slow Dieing) काही महिला व मुली तर या विश्वापासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. त्यांची ही खबरदारीची कृती त्यांना मागास राखते.
 स्त्रियांवर रोज आणि हरघडी कोसळणारं छत, आभाळ फाटलेली जमीन व रोज तुकड्या-तुकड्यांनी मरणे स्त्रीचे जीवन जे खरे तर अथांग सरोवर व्हायचे, ते टिकलीएवढे तळे बनून राहते. हे जेव्हा मी पाहतो तेव्हा का कुणास ठाऊक, मी बालवाडीत असताना आमच्या बाई शिकवित असलेल्या गोष्टी, बडबडगीते मला आठवत राहतात. त्यातील एका गोष्टीत राजाला होते दोन गाढवाचे कान. ते प्रजेला दिसू नयेत म्हणून तो आपले केस लांब ठेवायचा; पण ही गोष्ट त्याचे केस कापणाच्या नाभिकाला मात्र माहीत होती. तो नाभिक सतत अस्वस्थ असायचा. यातून सुटका करायची, हलके व्हायचे म्हणून तो एक दिवस नदीकिनारी जातो. किना-यावरच्या वाळूत खड्डा खणतो. त्यात तोंड घालून आकांताने ओरडतो, ‘राजाला गाढवाचे दोन कान आहेत. झालं. शेजारून जाणारा एक नागरिक ते ऐकतो. राज्यभर बोभाटा होतो. नाभिकाचा शिरच्छेद होतो. स्त्री नेमकी याच शिरच्छेदाच्या जिवंत मरणाच्या भीतीने छातीवर दगड ठेवून कोसळणारे छप्पर पेलत राहते. कधी जखमी हरीण तर कधी शिकार झालेलं ‘कांचनमृग', कधी ‘क्रौंचवध' तर कधी ‘दोन मने' घेऊन कुढत जगणे. त्या बाई एक बडबडगीतही शिकवायच्या. गाण्यात होता भित्रा ससा. त्याला त्या लाल, लुकलुकत्या डोळ्यांतून दिसणारे लाल लाल आकाश कल्पनेनेच कोसळते असे वाटायचे. तो सारखा जिवाच्या आकांताने ‘आकाश पडलं, पळा ऽ ऽ पळा' म्हणत पळत राहायचा नि कस्तुरी मृगा'सारखी त्याची गत व्हायची. जगातील स्त्री नव्या कस्तुरीगंधाच्या शोधात तळहातावर शिर घेऊन लढू पाहते आहे. तिला बळ हवे आहे, ‘माणूस' म्हणून जगता येईल असे. 'Women are also Human' हे पुरुषसत्ताक समाजाने प्रौढ, प्रगल्भपणे समजून घेऊन आपला वर्तन-व्यवहार अधिक स्त्रीदाक्षिण्याचा करायला हवा. 'मर्द को दर्द नहीं होता' असा स्त्रीचा होत जाणारा समज दूर करण्याची जबाबदारी आपलीच आहे. स्त्रीसंरक्षक कायद्यांपेक्षा स्त्रीसंरक्षक पुरुषी

सामाजिक विकासवेध/१६४