पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे लक्षात येते. मेहुणा, पाहुणा, काका, मामा, मावसभाऊ, आत्येभाऊ, चुलतभाऊ, मालक (नोकरी / व्यवसायाचा), शेजारी, नोकर, डॉक्टर, कर्जदार, शिक्षक, इ. मी असे म्हणत नाही की स्त्री पूर्ण निर्दोष; पण स्त्रीस पराधीन करणारी व्यवस्थाच याला जबाबदार नाही का? स्थिती बदलते आहे. छप्पर कोसळलेले पुरुषही मी जाणतो. स्त्रीअत्याचार पीडित पुरुष संघटनाही उदयाला आली आहे, हा भाग वेगळा; पण तो काही मुख्य प्रवाह नाही.
 आज आपण ज्या विज्ञान वरदानित माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत, त्या एकविसाव्या शतकातील स्त्री शिक्षित, मिळवती, नेतृत्वधारी, स्वयंसिद्धा झाली हे खरे आहे. ती स्वागतार्ह व अनुकरणीय गोष्ट खरी; पण म्हणून तिचा अन्याय, अत्याचार, शोषणाचा पाठलाग नि वनवास कमी झाला नाही. नवी शिक्षित स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे. ती संगणक, मोबाईल, इंटरनेट वापरते आहे. सामाजिक संपर्क व संवादाची फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, एसएमएस, विटर, ब्लॉग, ई-मेल, चॅटिंग, व्हाईस मेल, व्हिडिओ कॉलिंग सारी साधने पुरुषांच्या बरोबरीने व तोडीस तोड तिच्या हाती आली आहेत. त्यामुळे समानता, सहवास, संपर्क इ. अवकाशातून स्वतंत्र होते आहे. गत शतकातील श्रेष्ठ अमृता प्रीतम नावाच्या पंजाबी कवयित्रीने स्त्रीसाठी दिवाणखाना, शयनगृह नि स्वयंपाकगृह सोडून चौथी खोली' (कमरा) असली पाहिजे असे म्हटले होते. तो तिला संगणक, मोबाईलने दिला आहे. पण इथेपण छप्पर कोसळण्यासारखे आकाश फाटतेच आहे. 'युनो'नी गत दोन वर्षे ‘मुली व महिलांवरील आभासी (Cyber/Vertual) जगाचे अत्याचार (Violence Against Women and Girls (VAWG)) प्रकाशित केला आहे. (२०१५, २०१६) भारतातील स्त्रियांवरील संगणकीय संपर्कातून अत्याचारांवर संशोधन झाले आहे. पुरुष या माध्यमातूनही स्त्रीचं जीवन वेगवेगळ्या प्रकारे उद्ध्वस्त करतो आहे. तरुण मुलींवर या अत्याचारांचे दुष्परिणाम अधिक गंभीर आहेत. वारंवार मिस कॉल्स देऊन हैराण करणे, अश्लील संदेश पाठविणे, बीभत्स (Porn) क्लिप्स पाठविणे, विश्वासाने काढलेले फोटो, संदेश, संवाद (चॅट्स) आदी जगजाहीर करून बदनाम करणे, खोट्यानाट्या कंड्या पिकवून जबरदस्ती करणे (ब्लॅकमेलिंग), भावनिक, मानसिक छळ करण्याचे प्रकार सर्रास आढळतात. नोकरी करणाच्या महिला व मुलींच्या संगणकीय छळाला तर सीमाच नाही. कॉल सेंटर्स, बँक्स, कार्यालये, व्यवसाय इ. ठिकाणी व्यक्तिगत माहितीचे अपहरण (हॅकिंग),

सामाजिक विकासवेध/१६३