पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मला आजही वेगवेगळ्या रूपांत भेटतात तेव्हा छप्पर कोसळलेल्या स्त्रियांचा वनवास आधुनिक भारतातही कमी झाला नाही, हे प्रकर्षाने लक्षात येते नि गलबलायला होते.
 छप्पर कोसळलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांचा अभ्यास करून मालती बेडेकर (विभावरी शिरूरकर) यांनी सन १९६० च्या दरम्यान एक प्रबंध प्रकाशित केला आहे. तो केंद्र व तत्कालीन सरकारच्या पुढाकाराने नेमलेल्या समितीचा अभ्यास म्हणून त्याचे वास्तविक महत्त्व आहे. अभ्यासकाळातील स्त्रिया (सन १९४१ ते १९६१), त्यांचे जीवन यावर आधारित काही सत्यकथाही मालतीबाईंनी 'केसरी' दिवाळी अंकात सन १९५९ ला प्रकाशित केल्या होत्या. 'घराला मुकलेल्या स्त्रिया' नावाचं ते पुस्तक म्हणजे छप्पर कोसळलेल्या स्त्रियांची शोकगाथाच आहे. सुमारे तीन हजार स्त्रियांचा अभ्यास करून लिहिलेल्या या ग्रंथातून लक्षात येते की छप्पर कोसळण्याची कारणे, परी तरी किती ? नव-याकडून छळ, छळाने घरातून पळालेल्या व नव्या संकटात सापडलेल्या, अनैतिक (?) संकटग्रस्त, (विवाहपूर्व, विवाहोत्तर शरीरसंबंधाने बाधित), कामाच्या ठिकाणी बळी पडलेल्या, निराधारपणामुळे संकटग्रस्त झालेल्या, नव-याने टाकलेल्या, घटस्फोटित, स्वैराचारामुळे फसलेल्या, व्यभिचारी, नवरा परगावी कामाला म्हणून असुरक्षेच्या बळी, नव-याने दुसरे लग्न केल्याने निराधार, जबदस्तीने अपहरण केलेल्या (धाकदपटशा, धमकी, ब्लॅकमेलिंग इ.), वेश्या व्यवसायात विकल्या, फसवल्या गेल्याने गुंतलेल्या इ. मला सांगा, याला कारण असलेल्या पुरुष मानसिकता, पुरुषी समाज परंपरांचा कठोर पंचनामा (संशोधन, सर्वेक्षण, अभ्यास नव्हे!), जाब कधी कुणी विचारून तडीस नेला आहे का? 'निर्भया'चा एक बलात्कार उघडा झाला तर इतका हाहाकार! हे सर्व रामायण... त्यामागच्या रावणांचे दशमुखी दहन करणारी सामाजिक रामलीला आपण करणार आहोत की नाही? वरील कारणांनी स्त्रियांचे परागंदा होणे आजही पदोपदी दिसतेच ना?
 असाच केवळ कुमारी मातांच्या प्रश्नांचा अभ्यास सुलोचना देशमुख यांनी सन १९८३ मध्ये केला होता. सन १९९७ मध्ये तो पीएच.डी.चा प्रबंध (तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) देशमुख आणि कंपनी या तत्कालीन प्रख्यात प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. त्याचे शीर्षकच आहे ‘कुमारी माता'. सुलोचनाबाई म्हणजे या प्रकाशनाचे मालक रा. ज. देशमुखांच्या सुविद्य पत्नी. त्यांनी कुमारी मातांना फसविणा-या पुरुषांची दिलेली प्रतवारी वाचली तरी आजही छप्पर कोसळविणारे हेच असतात

सामाजिक विकासवेध/१६२