पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्यपद्धती. 'मीच नाही, माझ्यासह अनेक' असं रिंगण घेऊन ते रंगून कार्य करतात, पदं बदलतात; पण वेळ, पदरमोड ठरलेली. घरचं कार्य' म्हणून लष्कराच्या भाकरी भाजणारी ही स्मार्ट सोशल वर्करची फळी मला उद्याच्या खच्या ‘भारत उदयाचे शिल्पकार' वाटतात..
 महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती टिकावी, वाढावी म्हणून दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात असते. कारदगा, बेळगुंदी, सांबरा, आरग, उचगाव, कोडोली अशा अनेक ठिकाणी ही संमेलने वर्षानवर्षे भरत आली आहेत. अशोक तथा बाबा याळगी, महावीर पाटील, दिलीप चव्हाण यांच्यासारखे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकवर्गणी जमा करून ही संमेलने भरवित असतात. संमेलन गावसंमेलन असते. घरोघरी गुढ्या उभारल्या जातात. दारादारांत रांगोळ्या काढल्या जातात. गावजत्रा समजून माहेरवाशिणी माहेरी येतात. त्या दिवशी चूल बंद असते. गावाशेजारच्या शेता, अमराईत गावजेवण असतं. 'साहित्यिक येती गावा तोचि दिवाळी-दसरा' असा माहौल असतो. संमेलनाध्यक्ष म्हणून निवड केलेल्या साहित्यिकाची बैलगाडीत बसवून मिरवणूक काढली जाते. ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाते. परिसरातील शाळांतील विद्यार्थी, शिक्षक यांचे हिरिरीने आयोजन करतात. संमेलन अध्यक्ष साहित्यिकाच्या पायांवर घरोघरी पाणी त्यांचे ओतून औक्षण केले जाते. चित्ररथ सजवून मिरवणूक असते. हे सारे कार्य करणारी मंडळी इतके सारे श्रम घेतात ते केवळ 'माय मराठी'साठी. महिनाभर कार्यकर्ते पायांना भिंगरी बांधून फिरत असतात. साहित्यिकांचे उंबरे झिजवित असतात. ते साहित्यिकांचे वाचक, भक्त (फॅन) असतात. हे लिहीत नाही; परंतु त्यांचे वाचन चोखंदळ, चिकित्सक असते. सीमाभागातील या पंचवीस गावांमधून पंचवीस वर्षे होत असलेली ही संमेलनेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांइतकीच भव्य असतात. अध्यक्षीय भाषण, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, ग्रंथप्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम योजलेले असतात. ही कार्यकर्ती मंडळी साहित्यिकांच्या आतिथ्यात कोणतीही कसर ठेवीत नाहीत. एखादं समकालीन पुस्तक निवडून ते सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतात. प्रकाशकीय सवलत, संमेलन सबसिडी लक्षात घेता ही पुस्तकं निम्म्या किमतीस उपलब्ध होतात. वाचकांच्या घरोघरी आता घरगुती ग्रंथालये आकारली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व करणारे संमेलन मंचावर कधीच नसतात. हा असतो यांचा स्मार्टनेस ! संमेलन होताच हिशेब पूर्ण करून प्रत्येक देणगीदार, वर्गणीदार यांना देण्याचा चोख व्यवहार त्यांना दरवर्षी.
.     सामाजिक विकासवेध/१४८