पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चढत्या भाजणीने वर्गणी देतो. म्हणून ही साहित्य संमेलने दरवर्षी गतवर्षीपेक्षा वाढत्या थाटात साजरी होतात. कर्नाटक सरकार यांना दटावण्याचा प्रयत्न करते; पण मराठी मन, माती, माणूस मनगटातील साच्या ताकदीनिशी मुकाबला करीत माय मराठी जयघोष दुमदुमत ठेवतो.
 तिकडे जळगावला खानदेशातील अनाथ, प्रज्ञाचक्षु, दिव्यांग मुलामुलींना आपल्या 'दीपस्तंभ' संस्थेतर्फे 'मनोबल', ‘गुरुकुल', 'संजीवनी'सारख्या छोटेखानी वसतिगृहांतून निवडक विद्याथ्र्यांना दत्तक घेऊन त्यांच्या निवास, भोजन, शिक्षण, प्रशिक्षणाची सोय करणारा यजुर्वेद महाजनसारखा तरुण मला उद्याच्या भारताचा ‘उगवता तारा' वाटतो. तो स्वत: स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यास जातो. वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही अयशस्वी होतो. ठरवतो, आपण नाही झालो ना, आपल्या अपयशाचे उन्नयन करीत तो शेकडो विद्यार्थी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयकर अधिकारी करतो. अंध विद्याथ्र्याला कलेक्टर करणे, त्याची आत्मकथा प्रकाशित करणे यातील यजुर्वेदचा उमदेपणा अनुकरणीय! यजुर्वेद समृद्ध घरातला. आपल्या वाट्याला आलेली सारी इस्टेट ‘दीपस्तंभ'ला देऊन निरपेक्षत्व सिद्ध करतो. आज ‘दीपस्तंभ'मध्ये एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणातून ‘स्मार्ट’ भारत घडविण्याचं ‘स्मार्ट कार्य करणा-या यजुर्वेदच्या ‘दीपस्तंभ'तर्फे शिक्षण क्षेत्रात दुसरी क्रांती वंचितांचा अंत्योदय करते आहे. नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वसतिगृहे, ग्रंथालय, अभ्यासिका, आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान, व्याख्याने, कार्यशाळा, मुलाखती, मिशन सक्सेस, प्रकाशन किती कामे सांगू त्याची? घरी आई, पत्नी, मुलगा आहे. घर-गृहस्थीचा खर्च आहे. गाडी-घोडा आहे. गावोगावी व्याख्याने देतो. येणाच्या मानधनातून जगतो व इतरांना उभारी देत उभे करतो.
 जळगावातच आमचे असेच एक समाजाच्या लेखी वेडे ठरलेले प्राचार्य डॉ. सुरेश राणे आहेत. ते तेथील डॉ. बेंडाळे कन्या महाविद्यालयाचे प्रतिथितयश प्राचार्य, कॉलेज नॅक ए' ग्रेडचे. ते सांभाळत ते आपल्या विद्यार्थी सहायक समितीमार्फत कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह चालवितात. वसतिगृह सर्व जाती, धर्माने खुले. निवास, भोजन व्यवस्था उत्तम ग्रंथालय, अभ्यासिका, दवाखाना सर्व सोयी. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करायचा. अट एकच, प्रवेशापेक्षा अधिक मार्क मिळवायचे. पुढच्या वर्षी मागीलपेक्षा अधिक. प्रत्येक माणसाकडून रुपया-रुपया गोळा करतात. त्यांना पहिली देणगी रेल्वे हमालांनी दिली. जळगावच्या सर्व सामाजिक उपक्रमांत हा गृहस्थ दानपेटी घेऊन उभा असतो. लोक त्याला

सामाजिक विकासवेध/१४९