पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकवलं जायचं. 'Empty mind is devil's workshop.' जगच भूतबंगला, ब्रह्मराक्षसाचा वाडा होतो आहे. यंत्रनिर्माते गर्भश्रीमंत होतात व वापरणारे भिकारी असा आजवरचा जागतिक अनुभव आहे. यातून निर्माण होणारा रिकामा वेळ (Leisure) तुम्ही सत्कारणी लावू न शकाल तर तुमची भरती वेड्यांच्याच इस्पितळात. समृद्ध एकटेपण व संपन्न निष्क्रियता यांसारखी नजरकैदेची शिक्षा नाही. जर आपण काही भले करू इच्छित असू तर आपण स्वत:ला प्रश्न करायलाच हवा की मला विधायक, रचनात्मक, परहिताचं काय करता येणं शक्य आहे? 'पेरते व्हा' तसे करते व्हा' हा नवयुगाचा नवा उद्घोष आहे. एकीकडे कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची वाढती मागणी आणि दुसरीकडे शहाण्या-सुरत्या मोठ्या ज्येष्ठ वर्गाच्या अनुभव संपन्नतेची, शहाणपणाची उपेक्षा. शिक्षित म्हणजे उपयोगी हे समीकरण चुकीचे. उत्पादक अशिक्षित असला, अकुशल असला तरी उपयोगी असतो हे विसरता कामा नये. हातांना काम व डोक्याला ताण देता नाही आला तर नाश अटळ!

 या साऱ्या बदलाचे जगाबरोबर भारतावर झालेले परिणामही समजून घेण्यासारखे आहेत. भारतात बदलत्या जीवनशैलीमुळे एकटे जीवन कंठणाच्या निराधारांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यातही रुग्ण, वृद्ध आणि स्त्रियांची वाढती संख्या चिंताजनक आहे. समाजजीवनात वाढत्या असंबंधांचेच ते द्योतक आहे. पारंपरिक संयुक्त कुटुंबव्यवस्था जाऊन विभक्त कुटुंबव्यवस्था हे जसं या समस्येचं मूळ आहे, तद्वतच खेड्याकडून शहराकडे जाणारे, न थांबणारे लोंढे हे पण त्याचे एक कारण आहे. कसती शेती उजाड पडते आहे व कामाचे हात रिकामे राहिले आहेत ही वस्तुस्थिती आहे. विशेषतः पुरुष बळाचे नागरीकरण, नोकरीकरण यांतून ही परिस्थिती उद्भवते आहे. घरी व समाजात वरिष्ठांचा एकाधिकार संपून व्यक्तिस्वातंत्र्याने निर्माण झालेल्या स्वायत्ततेतून असंबंद्ध समाज आकारतो आहे. जीवनमूल्यांचा व्हास, नैतिकतेचं भय व अस्तित्व संपणं ही वरवरची कारणे असली तरी माणसाची आत्ममग्नता, स्वार्थ त्याच्या मुळाशी आहे, हे आपणास विसरता येणार नाही. शहरात स्त्रियांचे नोकरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता घरोघरचे बाल्य अनाथ, निराधार बालपण कंठते आहे. त्याचा ताण उभयपक्षी आहे. पालक व पाल्य समानपणे ताणतणावाचे जीवन जगत आहेत. घरोघरी हिंसा नित्याची होते आहे. सुना जीव मुठीत घेऊन जगण्याचे वाढते प्रमाण घरोघरचा असमंजसपणाच नाही का जाहीर करीत? सुशिक्षित, नोकरी करणाच्या स्त्रीवरचा वाढता पुरुषी संशय शिक्षणाने शहाणपण न आल्याचे जसे लक्षण आहे, तसेच ते पुरुषी अहंकार, दर्पाचेही! पुरुषाचे माणूस होणे

सामाजिक विकासवेध/११९