पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बदलती जीवनशैली व समाजजीवन


 वर्तमान किती बदलून गेलाय म्हणून सांगू ? गेल्या शतकातील पन्नास वर्षे मला आठवतात. टी. व्ही. नव्हता. मोबाईल्स नव्हते. संगणक नव्हता व्यवहारात. सुधारणा, आधुनिकता म्हणजे फोन, रस्ते, आगगाडी, पोस्ट, तार, सिनेमा, रेडिओ. घरोघरी माणसांचं येणं-जाणं, बोलणं, राहणं होतं. मामाचा गाव होता. आजोळ होतं. आईला माहेरची ओढ असायची. पैपाहुण्यांचं कोण आकर्षण! पुस्तकांचे गारुड होतं. मुलं खेळायची. मुली बागडायच्या. तरुण फिरायचे. प्रौढ सपत्निक नाटक, सिनेमाला जात. कुटुंबाच्या कुटुंब प्रवास करायचं. सामुदायिक उत्सव, जत्रा, बाजार यांना महत्त्व होतं. निवडणुकीत गाव, गल्ली एक होती. मृत खांद्यावरूनच जायचा. वरात घोड्यावरूनच निघायची. सनईचे सूर मांगल्याची खुण होती तर सतार शोक व्यक्त करायची. रंगांचं नि मनाचं नातं होतं. हातच्या स्वयंपाकाला चव होती. हॉटेलात जाणं निषेधार्ह मानलं जायचं. वडील माणसांचा आदर होता. शिक्षकांचा आदर्श होता. पोलिसांचं भय होतं.

 एकविसावं शतक दहा वर्षे आधीचं उजाडलं ... सुरू झालं. संगणक क्रांतीनं जग बदललं. जागतिकीकरणाची पहाट झाली. इंटरनेट, मोबाईल, वेबसाईट्स, सॉफ्टवेअर्सनी काळ, काम वेगाचं गणित इतिहासजमा करून टाकलं. माणसानं नवा डाव मांडायचं ठरवलं. गेल्या शतकाचं सारं मागं टाकायचं ठरवूनच एकविसावं शतक बहुधा जन्माला आलं. जुने जाऊ द्या मरणालागुनी' त्यानं ठरवूनच टाकलं होतं. पण असं नाही झालं की सगळेच बदल चांगले झाले. विशेषतः मूल्य, संस्कार, संबंध, संवाद, माणुसकी, सामाजिकता धोक्यात आली ती नव्या शतकाच्या नव्या विचारांनी. एंड ऑफ आइडियॉलॉजी', 'वर्ल्ड इज फ्लॅट’, ‘लिटरेचर इज डेड' अशा नकारात्मक विचारधारेतून जो समाज उदयाला आला, त्या समाजाला या नकारात्मक तत्त्वज्ञानाने आत्मरत केले. नार्सिसस होता-होता माणूस एकांडा, एकलकोंडा

सामाजिक विकासवेध/११६