पान:साथ (Sath).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकांना त्याच्या उदारपणातही अपमानित करण्याची चाल दिसत असे.
 आता रामविषयी रदबदली करण्यात फारसा अर्थ नाही असं वाटत असूनसुद्धा ज्योती म्हणाली, " राम खरंच तसा नाहीये, आई. तो तुमच्यावर उपकार करतो असं त्याला मुळीच वाटत नाही, किंवा तुम्ही अगदी त्याच्या मदतीच्या ओझ्याखाली दबून जावं अशीही त्याची अपेक्षा नाही. तो असं वागतो तो अरेरावीनं वागतो असं नाही, त्याला कळतच नाही चार लोकांत कसं वागावं, कसं बोलावं ते. नसतं काही लोकांना ते अंग. पण म्हणून त्याला तुमच्याबद्दल, तुझ्याबद्दल काही वाटत नाही असं समजू नकोस. तुझी काय अवस्था झालीय ती बघून तो तुला इथनं घेऊन जायला निघाला होता."
 " घेऊन जायला? कुठे ? त्याच्या घरी? त्याला वाटलं मी इथल्यापेक्षा तिथे जास्त सुखात राहीन ? नको बये, माझी इथून कुठे जाण्याची इच्छा नाही. तुझ्या बापाबरोबर इथे मी इतकी वर्ष काढली. आता मरेपर्यंत त्यांच्या आठवणी जपत इथेच रहायचंय मला."
 आपण काहीही बोललो तरी प्रकरण जास्तच चिघळणार हे जाणून ज्योती गप्प बसली. बापाच्या प्रदीर्घ आजारपणातून आईची सुटका झाली असं म्हणण्यात आपण चूकच केली असं तिला वाटलं. पण एखाद्या लहान मुलाची करावी तशी त्याची देखभाल करण्याचं तिला संकट वाटत नसेल अशी ज्योतीची कल्पनाच नव्हती. तिच्या आईच्या दृष्टीने तो चेतनाहीन गोळा हा अजूनही तिचा नवराच होता. केवळ नवराच नव्हे तर तिचं मूलसूद्धा. आणि हे मूल तीच संभाळीत असल्यामुळे तिची त्याच्यावर संपूर्ण सत्ता होती. ही त्यांच्या स्थानांतली अदलाबदल तिला भावली होती का? हा माणूस, तिचा नवरा, कुटुंबाचा कर्ता, घराचा मालक, ज्यानं लहानसहान कारणांसाठी तिच्यावर तोंड टाकलं, पदोपदी तू किती मूर्ख आहेस म्हणून तिला हिणवलं, तो आता प्रत्येक गोष्टीसाठी तिच्यावर अवलंबून होता, फक्त तीच त्याचं

साथ: ७९