पान:साथ (Sath).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंग पुसून त्याला कपडे घालायची, जेऊ घालायची, आणि लहान मुलाचे बोबडे अडखळणारे बोल जसे फक्त आईलाच समजतात तसं त्यांच्या घशातनं निघणाऱ्या विचित्र खरखर आवाजातनं तो काय म्हणू पहातोय हे समजण्याची कुवत फक्त तिलाच होती ह्याचंच तिला सुख होतं? की कधी एके काळी त्यांच्यात खरोखरच प्रेमाचा धागा होता? ज्योती कळण्याइतकी मोठी असल्यापासून तिला तिचा बाप एक खत्रूड, रागीट माणूस म्हणून आठवत होता. बायकोशी बोललाच तर काहीतरी वाकडं, टोमणेवजा. कधी बसून दोघांनी गप्पा मारल्यायत असं ज्योतीला आठवतच नव्हतं. तसं त्या दोघांच्यात बोलणं कमीच होतं, आणि जे व्हायचं ते असं टोचून-खोचून. तिच्या आईनं ह्या माणसावर कधी प्रेम केलं असेल हे विश्वास ठेवायला कठीण होतं. की हिंदू बाईच्या मनात जन्मल्यापासून बिबवली गेलेली विधवापणाची भयंकर भीती तिच्या आक्रोशाच्या मुळाशी होती ? तो कसा का असेना, जिवंत होता तोपर्यंत ती सधवा, सुवासिनी होती. तो मरताक्षणीच ती विधवा झाली – दयनीय, धार्मिक – सामाजिक समारंभांत काही स्थान नसलेली, दुर्लक्षित व्यक्ती.
 आईशी झालेल्या बोलण्याबद्दल ज्योतीने रामला काही सांगितलं नाही. तो पाठवीत असे त्याप्रमाणे पैसे पाठवीत राहिला, आणि तिची आई ते मुकाटयाने, कोणत्याही तऱ्हेने त्याचा उल्लेखसुद्धा न करता घेत राहिली. रामने ह्यावर कोणतीच प्रतिक्रिया दर्शविली नाही. कर्तव्यबुद्धीने तो पैसे पाठवीत राहिला, आणि त्याबद्दल कृतज्ञता मिळावी अशी त्याची अपेक्षाही नव्हती. अर्थात ह्याचा अर्थ उघड होता. ज्योती काहीही म्हणाली तरी सासू म्हणून किंवा एक माणूस म्हणून त्याला तिच्या आईशी काही देणंघेणं नव्हतं. शेवटी कधीतरी आपली आई आणि नवरा ह्यांच्यात कधीच मैत्रीचं नातं असू शकणार नाही ही गोष्ट ज्योतीनं स्वीकारली.

८०:साथ