पान:साथ (Sath).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकत्र कुटुंबातले हेवेदावे, क्षुल्लक कारणांवरून रंगणारी भांडणं, सत्तेचं राजकारण ह्या प्रकारांशी तिला कधी झुंज द्यावी लागली नाही. असं काय पुण्य तिनं केलं होतं की तिचं आयुष्य इतकं सुरळीत जावं ? आपली सासू जिवंत असती तर आपलं आयुष्य वेगळं झालं असतं का, असा विचार बरेचदा तिच्या मनात यायचा.
 मग आईकडे रहायचं नाही म्हटलं म्हणजे एखादी खोली भाड्याने घ्यायला हवी. त्यात काही अवघड नव्हतं. प्रश्न होता तो पोट भरण्याचा, नोकरीचा. जरी जगण्यापुरते पैसे असले, तरी काहीतरी काम केल्याशिवाय ती राहू शकली नसती. पण कसलं काम ? तिला चांगल्या प्रकारे जमणारं काम एकच होतं, ते म्हणजे एखाद्या सीड कंपनीत नोकरी. पण रामच्या एखाद्या स्पर्धकाकडे नोकरी करणं शक्य नव्हतं. मग राहता राहिल्या कारकून, अकाउंटंट असल्या नोकऱ्या. पण जवळ जवळ रिटायर व्हायच्या वयाला येऊन ठेपलेल्या बाईला कोण नोकरी देणार ? आणि तिनं ज्या स्वरूपाचं काम केलं, जी आव्हानं पेलली, त्यानंतर साधी कारकुनी नोकरी करणं हे इतकं मठ्ठ आणि कंटाळवाणं वाटणार होतं.
 अर्थात तिनं जे काम केलं होतं ते मुद्दाम स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडून वगैरे केलं नव्हतंच. रामची इच्छा होती त्याप्रमाणे ती वागली. समजा, तिनं गृहिणी व्हावं, अशी इच्छा त्यानं व्यक्त केली असती तर तिनं गृहिणी होण्यातच समाधान मानलं असतं.
 शिरगावला गेल्यावर पहिले काही दिवस कर्तव्यदक्ष सून अशी जी एक प्रतिमा तिच्या मनात तयार केली गेली होती त्याप्रमाणे ती वागायला पहायची.
 एकदा ती रामला म्हणाली, "मला अगदी अडाण्यासारखं वाटतं. इथली कितीतरी कामं मला करता येत नाहीत."
 " स्वयंपाकात वगैरे मदत करतेस की. आणखी काय करायचं असतं?"
 "मला गाईच्या धारा काढता येत नाही. त्यांना खायला टाकता येत नाही. पिकांना पाणी द्यायला येत नाही."

साथ: ४१