थोडा वेळ गप्प राहून तो म्हणाला, " आणि गाडी परत कशाला पाठवलीस? मी सांगितलं होतं. मला लागायची नाही म्हणून."
" मला पण लागायची नाही."
"पोरकटपणा करू नको."
तिनं मॅनेजरकडे नजर टाकली. तो टेबलावरच्या कशाशी तरी चाळा करीत आपलं लक्ष नसल्यासारखं दाखवीत होता, पण ज्योतीची खात्री होती, तो सगळं लक्षपूर्वक ऐकतोय म्हणून. तिनं विचार केला, मरूदे. रामच्या डोक्यात जर एवढं शिरत नसलं की फोन सार्वजनिक ठिकाणी आहे, तर कोण ऐकतंय याची मी तरी काळजी कशाला करू ?
" हे बघ राम," ती म्हणाली, " पोरकटपणा मी करीत नाहीये, तू करतोयस. मी इथे आलेय ती शांतपणे विचार करायला. तू जर ऊठसूट फोन करून मला डिस्टर्ब करायला लागलास तर त्यात काही अर्थच नाही."
" आयम सॉरी. फक्त तू स्वतःची गैरसोय करून घेऊ नयेस, एवढंच मला सांगायचं होतं. म्हणजे खर्चा बिर्चाचा विचार करून जर-"
"नाही केला."
" असं."
एकदम त्याचा चेहरा स्पष्ट तिच्या डोळ्यासमोर आला. नेहमीच्या कर्त्या करवित्या स्वरूपात नव्हे, पण जरा गडबडलेला, जरा दुखवला गेलेला, जे घडतंय त्याच्यावर आपला काही ताबा राहिलेला नाही अशी जाणीव झालेला. चटकन गुडनाइट म्हणून ती मॅनेजरच्या ऑफिसातनं बाहेर पडली. ती जेवणाच्या खोलीत परत गेली पण गारगोट्या झालेलं जेवण संपवण्याची तिला इच्छा नव्हती. दारापाशी ठेवलेल्या तबकातून एक विडा उचलून तिनं तोंडात टाकला आणि ती आपल्या खोलीकडे गेली.
ती रहात होती त्या भागात खोल्यांची एकेरी रांग आणि त्यांच्यासमोर लांबचलांब व्हरांडा होता. ती आपल्या खोलीसमोरच्या आरामखुर्चीत बसली. समोर निऑन ट्यूबच्या
साथ: १७