Jump to content

पान:साथ (Sath).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यष्टी ठेवण्यासाठी अखंड अर्धपोटी राहण्यावर तिचा विश्वास नव्हता. रामने तिच्या वजनाबद्दल कधीच कुरकुर केली नव्हती किंवा ती त्यामुळे बेढब दिसते असं दूरान्वयानेही कधी सुचवलं नव्हतं. त्यांचं लग्न झालं त्यावेळी तो सडपातळच काय, हडकुळा होता आणि बरीच वर्ष तसाच राहिला. मग अगदी अलीकडे त्याचं वजन एकदम वाढायला लागलं आणि त्याचं पोट सुटलं. हे त्याच्या पिण्यामुळे असलं पाहिजे, अशी तिची खात्री होती. तसं तिनं एकदोनदा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. शेवटी तिनं ठरवलं की, त्यानं जर आपल्या वजनाबद्दल आपल्याला टोचलं नाही, तर आपण त्याच्या वजनाबद्दल गप्प बसलं पाहिजे. पण तिला काळजी वाटत राहिली. कारण ह्या वयात एकदम वजन वाढणं प्रकृतीला वाईटच.
  ज्योतीनं तिचे खांद्यापर्यंत कापलेले केस रबर बँडने मागे बांधले, साडी ठीकठाक केली. आरशात स्वतःच्या हसऱ्या तोंडाकडे पाहताना तिला एकदम जाणवलं की, आपल्याला प्रसन्न वाटतंय. तिला थोडंसं अपराधी वाटलं, पण एकूण बरंच वाटलं. जेवायच्या खोलीत जाऊन ती एकटीच एका टेबलाशी बसली. तिला अनुभवाने माहीत झालं होतं की नेमकं जेवण तयार झाल्यावर पण इतर कुणी जेवायला यायच्या आत गेलं की आपल्याला चटकन जेवण मिळतं.
 तिचं जेवण अर्धमुधं होतंय तोवर मॅनेजरच्या ऑफिसातनं निरोप आला की तिला फोन आला होता. ती जरा अनिच्छेनेच उठली, तिनं कोपऱ्यातल्या वॉशबेसिनमधे हात धुतले, आणि तिथे ठेवलेल्या टॉवेलाचं रंगरूप पाहून साडीच्या पदरालाच पुसले.
 मॅनेजरने रिसीव्हर तिच्या हातात दिला आणि तो तिथेच बसून राहिला. खरं म्हणजे त्यानं तिथन उठायचं काही कारण नव्हतं, पण का कुणास ठाऊक, तो खोलीबाहेर जाईल असं तिला वाटलं होतं.
 ती हॅलो म्हणाली
 "ज्योती!"

साथ: १५