पान:साथ (Sath).pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजारातनं एक फेरी मारून यायचे, होटेलमधले नोकर आणि वारंवार गाठ पडल्याने ओळखीचे झालेले इतर पाहुणे ह्यांच्याबरोबर तीच ती शाब्दिक देवघेव करायचे. पण त्यात काही मजा उरली नव्हती.
 महाबळेश्वरात येणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस प्रमाणाबाहेर वाढत चालली होती आणि त्याचबरोबर तिथला धंदेवाईकपणाही. आपल्या मित्रमंडळींबरोबर ज्योती आणि राम बाजारपेठेत सतत पडणारी नव्या दुकानांची भर, भूछत्राप्रमाणे उगवणारी नवनवी होटेल्स, नितळ चेहऱ्यावरच्या मुरुमांप्रमाणे कुरूप दिसणान्या कॉलन्या आणि त्यांना जागा करून देण्यासाठी तुटणारी जंगलं ह्या सगळ्यांविरुद्ध उच्चरवाने तक्रार करीत. ज्योतीचा आवाज इतरांच्या इतकाच ठाम असला तरी आत कुठेतरी एक लहानसा आवाज तिला विचारायचा की तुला जे आवडतं तेच इतरांना आवडतं म्हणून तक्रार करायचा तुला काय हक्क आहे ? आम्ही पहिल्यापास्नं इथे येतोय, मागून उशिरा येणाऱ्यासाठी इथे सोय करायचं काही कारण नाही. असं कसं म्हणता येईल ? वाढत्या लोकसंख्येला सध्याची हिल स्टेशनं अपुरी पडत असली तर त्यांची वाढ व्हायलाच पाहिजे. मग ज्यांना गर्दी आवडत नसेल त्यांनी नवी ठिकाणं शोधून काढून तिथं हिल स्टेशनं वसवावीत. सह्याद्रीच्या माथ्यावर अशा ठिकाणांची काही कमतरता नाही.

 लवकरच अंधार पडणार, परत निघायला पाहिजे म्हणून ती उठली. होटेलात येईस्तोवर खूप चालण्याने दमल्यामुळे छान वाटत होतं आणि सपाटून भूक लागली होती. तिनं तोंड धुतलं आणि केस विंचरायला आरशासमोर उभी राहिली. तिनं स्वत:च्या जाड कमरेकडे आणि जुळ्या हनुवटीकडे काही खंत न वाटता पाहून घेतलं. ती चवळीच्या शेंगेसारखी कधीच नव्हती, आणि पंचवीस वर्ष आणि दोन बाळंतपणानंतर तिची जाडी फक्त डझनभर पौंडांनी वाढली होती. तिला चांगलंचुंगलं खायला आवडायचं आणि मध्यम वयातही विशीच्या तरुणीसारखी शरीर

१४: साथ