पान:साथ (Sath).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करायचा. आता मी त्याला हवीय, मला जाऊ देता कामा नये असं त्यानं ठरवलंय. का? कारण माझ्याशिवाय तो जगू शकणार नाही असं त्याला वाटतंय ? की बायको सोडून गेली म्हणून लोकांत आपलं हसं होईल असं वाटतंय ? की ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत ?
  " नुसतं डोकं हलवू नको, ज्यो. काहीतरी बोल ना."
 " हे जमणं शक्य नाही, राम. त्यावेळी होतो तसे आपण राहिलोत का ? आपल्यात कितीतरी बदल झालेत. आपण ही मधील सगळी वर्ष पुसून कशी टाकू शकू ?"
 " तसा प्रयत्न तर करता येईल ? आता तू परत आलीयस तर तू आनंदात राहाशील असं काहीही करायला मी तयार आहे. बोलत का नाहीस, ज्यो? तू परत आलीयस ना? ज्यो?".
 तिनं त्याच्या डोळ्यांत निरखून बघितलं. तो बोलतोय ते खरंच मनापासून बोलत असेल का? नसेल असं वाटायला तस काही कारण नव्हतं, कारण तो तिच्याशी तरी आत एक बाहेर एक असं कधीच वागला नव्हता. कदाचित तो म्हणतोय ते बरोबर असेलही. शेवटी आयुष्याच्या समीकरणाचे दोन सम भाग आम्हीच दोघं होतो आणि आहोत. बाकी कशाचा विचार करायचं काय कारण आहे ?
 अनोख्या प्रदेशात प्रवास करून परत आल्यावर थोडीशी हुरहुर वाटावी, पण ओळखीच्या खुणा पाहून आनंद व्हावा, तसं तिला वाटलं.
 ती सावकाश निःश्वास सोडीत म्हणाली, " होय, राम, मी परत आलेय. घरी परत आलेय."

१७८ : साथ